अंबादास दानवे File Photo
मुंबई

अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार

लाड यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी पाच दिवसांसाठी निलंबन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भाजपचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी पाच दिवसांसाठी निलंबित केलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निलंबन कालावधी कमी केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

बुधवारी दानवे यांनीही उपसभापती डॉ. गोर्‍हे यांना पत्र पाठवत दिलगिरी व्यक्त केली. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मला अधिवेशनात शेतकरी श्रमिक आणि इतर घटकांचे प्रश्न मांडावयाचे आहेत. त्यामुळे माझे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती दानवे यांनी केली. दरम्यान, दुपारच्या सत्रात कामकाज सुरू झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य सचिन अहिर यांनी सभागृहात विरोधी पक्षनेता नसल्यामुळे आम्ही कामकाज रेटून नेत आहोत, असा समज होत आहे. त्यामुळे दानवे यांचे निलंबन रद्द करावे, अशी मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. गोर्‍हे यांच्या दालनात झालेल्या चर्चेनुसार, दानवे यांचे निलंबन रद्द करावे किंवा कसे याबाबत गुरुवारी निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. मात्र, दानवे यांचे निलंबन रद्द केले जाणार नाही. असे केल्यास सत्ताधारी पक्षाविषयी गैरसमज पसरेल. त्यामुळे निलंबन रद्द करण्याऐवजी निलंबनाचा कालावधी कमी केला जाऊ शकतो, अशी शक्यता विधिमंडळातील एका अधिकार्‍याने व्यक्त केली.

काँग्रेस सदस्य अभिजित वंजारी यांनी कामकाज सुरू असताना आपल्या भाषणातून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविषयी असंसदीय शब्द वापरला असल्याची तक्रार भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली. यावरून दरेकर आणि वंजारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. परंतु, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि वंजारी यांच्या भाषणात असंसदीय शब्द असल्यास कामकाजातून वगळून टाकावा, अशी विनंती त्यांनी उपसभापती डॉ. गोर्‍हे यांना केली. ती मान्य करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT