Maharashtra Politics Pudhari
मुंबई

Maharashtra Politics: शेतकऱ्यांना साठेबाज ठरवून सरकारची ‌‘सर्कस‌’ सुरू; अंबादास दानवे यांची टीका

पेरणीच्या तोंडावर बियाणे आणि डिझेलसाठी व्याजाने पैसे उभे करणाऱ्या शेतकऱ्यांनाच सरकार साठेबाज ठरवत असल्याची टीका त्यांनी केली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यात आणि देशात सरकारच्या नावाखाली सध्या निव्वळ सर्कस सुरू असल्याचा घणाघात विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. पेरणीच्या तोंडावर बियाणे आणि डिझेलसाठी व्याजाने पैसे उभे करणाऱ्या शेतकऱ्यांनाच सरकार साठेबाज ठरवत असल्याची टीका त्यांनी केली.

कथित साठेबाजी होत असल्याचा सरकारचा दावा असेल, तर एकतरी साठा जप्त झाला आहे का? याचे उत्तर सरकारने द्यावे. जर साठेबाजी होत नसेल, तर पुरवठा विभाग झोपला आहे का? असा सवालही त्यांनी केला.

जालना जिल्ह्यात डिझेल विक्रीसंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशावरही त्यांनी निशाणा साधला. ट्रॅक्टरची कागदपत्रे आणि नोंदणी क्रमांक दाखवल्याशिवाय कॅनमध्ये डिझेल देऊ नये, असा आदेश प्रशासनाने दिल्याचा उल्लेख करत त्यांनी संताप व्यक्त केला. नांगरणीसाठी भाड्याने ट्रॅक्टर आणणाऱ्या गरीब शेतकऱ्यांनी मग डिझेल कुठून आणायचे, याचे उत्तर सरकारकडे नाही, असे ते म्हणाले.

जनतेच्या हातातील गाड्या हिरावून घेऊन त्यांच्या हातात हातगाड्या देणे, हाच या सरकारचा मास्टरस्ट्रोक दिसतोय, असा टोला लगावत दानवेंनी सरकारवर सडकून टीका केली. दरम्यान, पेरणीपूर्व काळात डिझेल उपलब्धता, इंधनसाठा आणि प्रशासनाच्या निर्बंधांमुळे ग्रामीण भागात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT