Amazon Delivery Partners Pudhari
मुंबई

Amazon Delivery Partners: अॅमेझॉनचा 90 हजार डिलिव्हरी पार्टनर्सना मोठा दिलासा! आरोग्य विम्यात मोठी वाढ

Amazon Delivery Partners: अॅमेझॉन इंडियाने भारतातील सुमारे 90 हजार डिलिव्हरी पार्टनर्ससाठी आरोग्य आणि विमा सुविधांमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Amazon Delivery Partners: ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी Amazon India ने भारतातील सुमारे 90 हजार डिलिव्हरी पार्टनर्ससाठी आरोग्य आणि विमा सुविधांमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे. या नव्या उपक्रमांतर्गत डिलिव्हरी पार्टनर्सना अधिक वैद्यकीय संरक्षण, अपघात विमा आणि कुटुंबासाठी आरोग्य लाभ दिले जाणार आहेत.

कंपनीने जाहीर केलेल्या नव्या सुविधांनुसार, डिलिव्हरी पार्टनर्सना आता 1.5 लाख रुपयांपर्यंत मेडिक्लेम कव्हरेज, 10 हजार रुपयांपर्यंत OPD (बाह्यरुग्ण) खर्चाची भरपाई आणि 10 लाख रुपयांपर्यंत अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेचा उद्देश केवळ रुग्णालयीन खर्च भागवणे नसून दुखापतीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसाना पासून संरक्षण देणे हा आहे.

विशेष म्हणजे, या आरोग्य सुविधांचा लाभ केवळ डिलिव्हरी पार्टनर्सपुरता मर्यादित राहणार नाही. त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांपर्यंतही आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये अमर्याद बहुभाषिक ऑनलाइन डॉक्टर सल्ला (टेलीकन्सल्टेशन), दरवर्षी दोन मोफत OPD भेटी, तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून मत (Second Opinion) घेण्याची सुविधा दिली जाणार आहे.

याशिवाय, डोळे, दात आणि इतर आरोग्य सेवांवर सवलती, निदान चाचण्या (डायग्नोस्टिक्स), औषधे आणि फिटनेससंबंधी सहाय्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे. कंपनीच्या मते, या उपाययोजनांमुळे डिलिव्हरी पार्टनर्सच्या आरोग्याबरोबरच आर्थिक सुरक्षिततेलाही बळ मिळेल.

अॅमेझॉनने देशभरात विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचाही निर्णय घेतला आहे. या शिबिरांमध्ये डिलिव्हरी पार्टनर्सना डोळ्यांची तपासणी, दंत तपासणी, BMI मूल्यांकन आणि सामान्य आरोग्य तपासणी विनामूल्य करून दिली जाणार आहे. भारतातील कोणत्याही अॅमेझॉन डिलिव्हरी स्टेशनवर उभारलेल्या शिबिरांमध्ये सरकारी ओळखपत्र दाखवून या सेवांचा लाभ घेता येणार आहे.

अॅमेझॉन इंडियाचे ऑपरेशन्स डायरेक्टर सलीम मेमन यांनी सांगितले की, “डिलिव्हरी पार्टनर्स हे आमच्या नेटवर्कचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आमच्यासाठी आवश्यक आहे. या नव्या सुविधांमुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्य सुरक्षेला अधिक आधार मिळेल.”

हे सर्व उपक्रम अॅमेझॉनने नुकत्याच जाहीर केलेल्या 2,800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा भाग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या गुंतवणुकीतून डिलिव्हरी पार्टनर्सचे आरोग्य, सुरक्षा आणि आर्थिक कल्याण मजबूत करण्याबरोबरच भारतातील लॉजिस्टिक्स नेटवर्क अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, कंपनीने ‘प्रोजेक्ट आश्रय’ अंतर्गत डिलिव्हरी पार्टनर्ससाठी विश्रांती केंद्रांचा विस्तार, मोफत रुग्णवाहिका सेवा, रस्ते सुरक्षा प्रशिक्षण आणि मुलांसाठी ‘प्रतिधी’ शिष्यवृत्ती यांसारखे उपक्रमही सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT