Edible Oil Seizure Pudhari
मुंबई

Edible Oil Seizure: भेसळीच्या संशयाने ७ हजार किलो खाद्यतेल जप्त; दोन तेल व्यावसायिकांचे परवाने निलंबित

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकोल्यातील दोन तेल व्यावसायिकांवर FDAची कारवाई. ७,०२६.८ किलो खाद्यतेल, ११.८२ लाखांचा माल जप्त; परवाने निलंबित.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक कारवाई सुरू केली आहे.

२५ आणि २७ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या कारवाईत अकोल्यातील दोन तेल व्यावसायिकांकडून तब्बल ७ हजार २६.८ किलो खाद्यतेल, ११ लाख ८२ हजार ६५० रुपये किमतीचे जप्त करण्यात आले. गंभीर त्रुटी आढळल्याने दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

अकोला येथील एमआयडीसी परिसरातील मे. प्रभुदयाळ लक्ष्मीनारायण या पेढीची तपासणी केली असता ‘शक्ती’ रिफाइंड सोयाबीन तेलाचा नमुना घेण्यात आला. उर्वरित साठ्यात भेसळीचा संशय आढळल्याने साठ्याची विक्री थांबविण्यात आली.

आवश्यक प्रयोगशाळा व्यवस्था नसणे, प्रयोगशाळेचे अहवाल उपलब्ध नसणे तसेच परवान्याच्या अटींचे उल्लंघन करून तेलाची विक्री होत असल्याचे आढळले. त्यामुळे ३४२८.४ किलो, ६ लाख २१ हजार ३०० रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त करण्यात आले.

त्याचप्रमाणे मे. भारतकुमार अँड ब्रदर्स, एमआयडीसी, अकोला या पेढीची तपासणी केली असता रिफाइंड सोयाबीन तेलाचा नमुना घेण्यात आला. उर्वरित साठ्यात भेसळीचा संशय, आवश्यक प्रयोगशाळा व्यवस्था व अहवालांचा अभाव तसेच सैल तेलाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत ३५९८.४ किलो, ५ लाख ६१ हजार ३५० रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त करण्यात आले.

‘रिॲक्टिन प्लस’प्रकरणी सिप्लाचा औषध विक्री परवाना रद्द

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांच्या वापराला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता असलेल्या ‘रिॲक्टिन प्लस’ गोळ्यांच्या पॅकेजिंगवर अनधिकृत जाहिरात केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे.

मे. सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड, वडकी, पुणे या कंपनीचा औषध विक्री व वितरणाचा (सी अँड एफ) परवाना २७ ऑगस्ट पासून रद्द करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT