Maharashtra Politics |
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार आहेत.
राष्ट्रवादीने वरळीच्या जांबोरी मैदानात १ ते ४ मे दरम्यान आयोजित केलेल्या 'गौरवशाली महाराष्ट्र' महोत्सवात हा सत्कार होईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा सचित्र इतिहास मांडणारे गर्जा महाराष्ट्र दालन, महाराष्ट्राचा विचार घडवणाऱ्या महापुरुषांचे विचारसूत्र दालन, संत-महात्म्यांची शिकवणूक सांगणारे महाराष्ट्रधर्म' दालन, विविध क्षेत्रात देशस्तरावरील व महाराष्ट्राचे सर्वोच्च पुरस्कार मिळवणाऱ्या ख्यातनाम व्यक्तीचे महाराष्ट्र रत्न दालन व राज्याच्या ६५ वर्षांच्या वाटचालीत सर्व मुख्यमंत्र्यांच्या योगदानाची विशेष दखल घेणारे मुख्यमंत्री दालन या महोत्सवात उभारण्यात येईल.
राज्यभरातून नद्यांचे पवित्र जलकलश आणि पवित्र व ऐतिहासिक ठिकाणावरील माती (मृदा) कलश घेऊन सहा प्रादेशिक विभागातून सहा महाराष्ट्र गौरव कलश रथ १ मे रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांची शोभायात्रा १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता निघणार असून यात्रेचा समारोप कार्यक्रमस्थळी होईल.