Ajit Pawar plane crash |
कुटुंबातील मोठ्या भावाला दादा म्हणतात. वडिलांनंतर कुटुंबातील तोच कर्ता पुरुष. त्यामुळेच तो लहान वयातच कर्ता होतो. सतत कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे, अशा भावनेतून तो लहानग्यांवर लक्ष ठेवतो. म्हणूनच तो घराचा आधारवडही बनतो. आपसूक लहान भावांचा आदर्शही बनतो. अजित पवार हे पवार कुटुंबातील दादा होते. तसेच ते राजकारणातीलही दादा झाले. रोखठोक बोलणे, अव्याहत कार्यरत राहणे, टीकेला भीक न घालता आपला पक्ष आणि कार्यकर्ता यांच्यासाठी झटणे असो की अस्सल मराठमोळा नेता म्हणून जगणं हे सारं काही त्याच्या ठायी होतं. म्हणूनच आज अजितदादा यांच्या आकस्मिक 'एक्झिट'वर महाराष्ट्र हळहळला...
कुटुंबातून राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या अजित पवारांनी आपल्या कार्यशैलीमुळे राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. १९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला प्रारंभ केला. तेव्हापासून २८ जानेवारी २०२६ या तारखेच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते राजकारणात सक्रिय राहिले. जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचार सभांसाठी ते बारामतीमध्ये पोहोचले असताना विमानाला दुर्घटना झाली. जाणून घेऊया अजित पवार एक राजकीय नेते आणि व्यक्ती म्हणून त्यांचे वेगळेपण सांगणारे काही प्रसंग...
राजकीय नेत्याची खरी कसोटी असते ती संकट आणि दुर्घटनांच्या काळात. २५ जानेवारी २००५ रोजी सातारा जिल्ह्यातील वाई येथील मांढरदेवी देवस्थानच्या परिसरात झालेली चेंगराचेंगरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक होती. त्या वेळी अजित पवार हे पुनर्वसन आणि जलसंपदा मंत्री होते. दुर्घटनेची माहिती मिळताच अजित पवारांनी प्रत्यक्ष गडावर जाऊन पाहणी केली. जखमींना रुग्णालयात दाखल करणे, मृतांच्या नातेवाईकांना मदत पोहोचवणे आणि विस्कळीत झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेचा ताबा घेऊन त्यांनी अत्यंत धैर्याने पत्तीमध्ये मदत आणि पुनर्वसनाचे कार्य केले.
अत्यंत स्पष्टवक्ते नेते अशी अजित पवारांची ओळख होती. विशेष म्हणजे अजित पवार हे वेळेचे पक्के होते. सकाळी सहापासून कार्यरत राहणारा हा राजकीय नेता विधानसभेचे सभागृह असो की सार्वजनिक कार्यक्रम, वावगे वागणे आणि बोलणे यावर ते नेहमी सडेतोड प्रत्युत्तर देत असत. मागील दोन दशकांमध्ये त्यांनी राजकारणातील दादा ही आपली ओळख आपल्या बोलण्यातून आणि वर्तनातूनही वारंवार दाखवून दिली होती.
सांगलीत एका सभेवेळी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना त्यांनी तंबाखूचे व्यसन सोडावे, अशी सूचना अजित पवारांनी थेट व्यासपीठावरूनच केली होती. दुर्दैवाने आर. आर. पाटील यांचे कर्करोगाने निधन झाले. यानंतरही वारंवार अजित पवार हे अनेक सभांमधून आपल्याला सुपारीच्या खंडाचेही व्यसन नाही, असे अभिमानाने सांगत तसेच व्यसन किती घातक आहे, असा इशाराही तरुणाईला सातत्याने देत असत.
वेळेच्या बाबत आणि शासकीय कामाच्या पाठपुरावा करण्याबाबत अजित पवार यांची संपूर्ण राज्याला ओळख होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सलग १५ वर्षे अजित पवारांनी विविध मंत्रीपदे सांभाळली. या काळात त्यांचा कामाचा उरक हा प्रचंड होता. विधानसभेत कामकाजात पटलावर मांडण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या विषयांना विलंब झाला तर सहकारी मंत्र्यांना सुनावण्यासही त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही. रोखठोक भूमिका आणि शक्य असेल तरच आश्वासन देणारा नेता, अशी जनमानसात त्यांची प्रतिमा होती.
अजित पवारांची भाषणशैली ही ग्रामीण भागासह शहरी भागातील तरुणाईला विशेष पसंत होती. सोशल मीडियावरही त्यांच्या भाषणातील 'विनोद' हे तुफान व्हायरल होत. आपल्या भाषणात दरडावणे आणि अचूक टायमिंग साधत राजकीय नेत्यांना मारलेले टोमणे याची भूरळ त्यांच्या विरोधकांनाही होती. शरद पवारांनी जेव्हा निवृत्तीचा निर्णय जाहीर केला, त्या कार्यक्रमातही अजितदादा अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. कोणीही भावनिक होऊ नका, असे आवाहन करत त्यांनी शरद पवारांच्या निवृत्तीचा निर्णयबरोबर असल्याचेही स्पष्ट केले होते. शक्य असेल तरच काम पूर्ण करण्याचे आश्वासन देयचं. नाहीतर स्पष्टपणे चुकीवरच बोट ठेवायचे, अशी त्यांची कार्यशैली होती. मात्र आपल्या सडेतोड भूमिकेमुळे त्यांना अनेकवळा टीकेला सामोरे जावे लागले. याची राजकीय किंमतही त्यांनी मोजली.
अजित पवार हे बहुतांश वेळा दर शनिवारी किंवा रविवारी बारामती दौर्यावर असत. सकाळी सात वाजल्यापासून सर्वसामान्यंच्या समस्या ऐकून घेण्यासाठी उपलब्ध असत. अत्यंत शिस्तबद्ध आणि वेळेच्या अचूक नियोजनामुळे शेकडो लोकांच्या समस्या ते प्रत्यक्ष ऐकत. कोणताही मध्यस्थ न ठेवता ते थेट सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत. आलेल्या तक्रारींवर संबंधित अधिकारी असो की अन्य कोणी, फोन करून किंवा लेखी आदेश देऊन जागेवरच तोडगा काढण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे बारामतीमधील जनता दरबाराची चर्चा राज्यभरात होती. राजकारणापलिकडे जावून सर्वसामान्यांना मदत करणारी त्यांची वृत्तीचे त्यांचे राजकीय विरोधकही कौतूक करत.