मुंबई : पाऊस, ऊन, बॉम्बस्फोट आणि आगीपासून सुरक्षित राहणारा विमानातील ब्लॅक बॉक्स हा राजकारण्यांपासून मात्र असुरक्षित आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या आरोपावरून अजित पवार यांच्या विमानाला घातपात झाल्याचा संशय आणखी गडद केला आहे.
अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत अनेक शंका घेतल्या जात आहेत. अशा स्थितीत ब्लॅक बॉक्स आणि रेकॉर्डरचे अपघातानंतर विमानाला लागलेल्या आगीत नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठविण्यात आल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्स राजकारण्यांपासून असुरक्षित असल्याचे विधान केले आहे. विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत आता काय राजकारण चालले आहे, हे आपल्याला बघावे लागेल. त्याच्या खोलामध्येही जावे लागेल, असे आ. रोहित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करत होते. विशेषतः जयंत पाटील यांना ते नेहमी भेटायचे. गेल्या दीड वर्षामधील सीसीटीव्ही चित्रीकरण काढून तपासा म्हणजे अजित पवार हे जयंत पाटील यांना कितीवेळा भेटले हे कळेल, असेही आ. रोहित पवार म्हणाले.
काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी गंभीर शंका व्यक्त केली आहे. अजित पवार यांचा मृत्यू अपघाती वाटत नाही. या घटनेत काहीतरी संशयास्पद आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडल्यामुळे त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ ‘दाल में कुछ काला है’ असेच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया आ. वडेट्टीवार यांनी दिली आहे.