मुंबई : धर्मापेक्षा विमानतळाची सुरक्षा ही महत्वाची असून कोणत्याही धार्मिक अथवा अन्य कारणासाठी तडजोड होऊच शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने विमानतळ परिसरात रमजाननिमित्त नमाज पठण करण्याची मागणी फेटाळून लावली.न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने अखेर सुरक्षेच्या कारणास्तव याचिका निकाली काढली.
सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यातही, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्थानिक विमान टर्मिनल परिसरातील तात्पुरत्या शेडमध्ये रिक्षा-टॅक्सी आणि ओला-उबर कॅब चालकांना नमाज पठण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करीत टॅक्सी-रिक्षा ओला-उबर मेन्स युनियनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागील सुनावणीच्या वेळी खंडपीठाने मानवतावादी दृष्टिकोनातून रमजान महिन्यात टॅक्सी आणि रिक्षा चालकांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात नमाज पठाणाला परवानगी देता येईल का अशी विचारणा राज्य सरकार आणि एमएमआरडीएला केली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीच्यावेळी राज्य सरकारने सुरक्षेचे कारण पुढे करत याचिककर्त्या संघटनेची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही, अशी भूमिका घेतली. ती खंडपीठाने मान्य करत याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावत याचिका निकाली काढली.
न्यायालय म्हणते
रमजान गेल्या महिनात 19 फेब्रुवारीला सुरु झाला. विमानतळ परिसरात नमाजा साठी परवानगी मिळाली नाही, म्हणून नमाज पठण थांबले का? नमाज पठण करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. असे असले तरी नमाज पठणासाठी तुम्हाला विशिष्ट जागेचा हट्ट धरून मागणी करता येणार नाही. उद्या तुम्ही गोल मैदानाची मागणी कराल तर ती मान्य करायची का? असे खडेबोल खंडापीठाने याचिकाकर्त्यांना सुनावले.
जगात विमानतळावरून सर्वच जाती, धर्म, समाजाचे नागरिक प्रवास करतात . तसेच महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचीही विमानतळावर ये जा असते. या सर्व परिस्थितीचा विचार करता सुरक्षतेचा मुद्द्यावर या परिसरात नमाज पठाणासाठी परवानगी देता येणार नाही.