नवी मुंबई : नवी मुंबई शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐरोली येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून नववर्षात हे स्मारक नागरिकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐरोलीसह नवी मुंबईतील शिवप्रेमी आणि नागरिकांची अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा संपणार आहे.
ऐरोली सेक्टर १० येथील भूखंड क्र. २० वर हे भव्य शिवस्मारक साकारण्यात येत आहे. या स्मारकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज यांचा ३६ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. केवळ पुतळ्यापुरते मर्यादित न राहता शिवरायांचा पराक्रमी इतिहास, त्यांची युद्धनीती व स्वराज्य स्थापनेचा गौरवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने येथे विशेष दालनही उभारण्यात येत आहे.
या दालनात शिवकालीन शस्त्रे, नाणी, मोडी लिपीतील पत्रे तसेच शिवकालीन इतिहासाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ममित चौगुले यांच्या प्रयत्नांतून या स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे.
ऐरोली परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी शिवप्रेमींची अनेक वर्षांपासून मागणी होती. त्यानुसार या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी १३ कोटी ६५ लाख ८४,५६२ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मे. स्वस्तिक इन्फ्रालॉजिक्स प्रा. लि. या कंपनीला स्मारक उभारणीचे काम देण्यात आले आहे. नियोजित मुदतीनुसार काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना आता प्रत्यक्ष काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
या स्मारकामुळे ऐरोलीच्या वैभवात भर पडणार असून हे ठिकाण केवळ पर्यटनाचे केंद्र न राहता विद्यार्थ्यांसह नव्या पिढीला छ. शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याची प्रेरणा देणारे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. नववर्षात स्मारकाचे लोकार्पण झाल्यानंतर शिवप्रेमींना या भव्य स्मारकाचे दर्शन घेता येणार आहे.