उच्च शिक्षणातील पारदर्शकतेसाठी घेणार एआयचा आधार  Pudhari File Photo
मुंबई

AI-based verification system : उच्च शिक्षणातील पारदर्शकतेसाठी घेणार एआयचा आधार

एनईटीएफचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यमापन आणि मानांकन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी व चुकीचा डेटा ओळखण्यासाठी एआय आधारित पडताळणी प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एनईटीएफचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी दिली.

‌‘वन नेशन, वन डेटा‌’ या संकल्पनेअंतर्गत सर्व विद्यापीठांचा डेटा एकत्रित करण्याचे कामही सुरू आहे. महाविद्यालये व विद्यापीठांची माहिती अधिकृत संकेतस्थळावर सार्वजनिकपणे उपलब्ध झाल्यानंतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध झाल्यानंतर त्रयस्थ व्यक्तीकडून त्याची पडताळणी करणे शक्य होणार आहे.

यामध्ये कोणतीही तक्रार आली, तर त्या संस्थेच्या आकडेवारीची सखोल चौकशी करता येईल. एखाद्या संस्थेकडून दरवर्षी 10 ते 20 संशोधन लेख प्रकाशित केल्याची माहिती दिली आणि एखाद्या वर्षी अचानक 100 संशोधन लेख प्रकाशित झाल्याचा दावा केला, तर अशा प्रकरणांची एआय प्रणालीद्वारे नोंद होईल. त्यानंतर त्या आकडेवारीची स्वतंत्र पडताळणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

उच्च शिक्षण संस्थांना दिलेल्या निर्देशानुसार अनेक विद्यापीठे व महाविद्यालये यांनी त्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. मात्र अद्यापही याची सर्वत्र अमलबजावणी झालेली नाही. ही प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने राबविण्यात येत असली तरी शिक्षण संस्थांकडून देण्यात येणाऱ्या माहितीच्या विश्वासार्हतेबाबत अनेकदा शंका उपस्थित करण्यात येत आहे.

तृतीय पक्ष सर्वेक्षणाद्वारे माहितीची पडताळणी

संस्थांकडून मिळणाऱ्या आकडेवारीवर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे एआयच्या साहाय्याने तृतीय पक्ष सर्वेक्षणाद्वारे माहितीची पडताळणी करण्याची योजना तयार करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, माध्यम प्रतिनिधी, विविध हितधारक यांच्याकडून माहिती गोळा करून तिचे विश्लेषण करून सत्यता पडताळण्यात येणार आहे. तृतीय पक्ष सर्व्हेमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तीच्या विश्वासार्हतेचे गुणांकनही करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT