AI Based EV Battery Pudhari
मुंबई

AI Based EV Battery: ई-स्कूटरसाठी ‘स्मार्ट’ एआय चार्जर; मुंबईत विकसित उपकरणाला डिझाइन पेटंट

बॅटरीची क्षमता व उष्णतेनुसार स्वयंचलित चार्जिंग; वीज बचत आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणारे संशोधन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : घरासमोर किंवा घराखाली ई-स्कूटर लावून चार्जिंगला ठेवली की ‌‘पूर्ण चार्ज‌’ होण्यासाठी किती वेळ लागेल या रोजच्या त्रासाला आता ‌‘स्मार्ट‌’ उपाय शोधला आहे. इंडियन मेरिटाईम विद्यापीठाच्या मुंबई पोर्ट कॅम्पसमधील संशोधकांनी एआय-आधारित (कृत्रिम प्रज्ञा) बॅटरी चार्जर विकसित केला असून या उपकरणाच्या रचनेला औद्योगिक डिझाइन पेटंटची अधिकृत नोंदणी मिळाली आहे.

देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असताना बॅटरीची कार्यक्षमता आणि सुरक्षितता हा मोठा प्रश्न ठरत आहे. पारंपरिक चार्जर मध्ये बॅटरीच्या स्थितीनुसार चार्जिंग होत नाही. मात्र नव्या उपकरणात बॅटरीची क्षमता, उष्णता आणि वापराची पद्धत लक्षात घेऊन चार्जिंग आपोआप नियंत्रित केले जाते. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होत असल्याचे म्हटले आहे. नियोजनबद्ध चार्जिंग सायकल, बॅटरी आरोग्य तपासणी, लोड व्यवस्थापन, उष्णता नियंत्रण आणि अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था, ही या चार्जरची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. बॅटरी पूर्ण भरल्यानंतर वीजपुरवठा आपोआप कमी करणे किंवा थांबवणे, तसेच विजेचा अपव्यय टाळणे, या सुविधा यात समाविष्ट आहेत. परिणामी वीज बचत शक्य होते.

तांत्रिकदृष्ट्या हे उपकरण साधे दिसत असले, तरी त्यामागे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गणिती प्रणाली कार्यरत आहे.या उपकरणाची बाह्य रचना, आकार आणि संरचनेसाठी ‌‘डिझाइन ॲक्ट 2000‌’ आणि ‌‘डिझाइन नियम 2001‌’ अंतर्गत वर्ग 13-02मध्ये नोंदणी करण्यात आली आहे. ही नोंदणी म्हणजे संशोधनाला अधिकृत पेटंटची मोहोर मिळाल्याचे मानले जाते. त्यामुळे या डिझाइनचा वापर आणि व्यावसायिक विकासासाठी विद्यापीठाला बौद्धिक संपदा हक्क प्राप्त झाले आहेत.

हे संशोधन डॉ. अभिमन्यू के. चांदगुडे, डॉ. एस. थंगलक्ष्मी आणि डॉ. ए. अरुण प्रेमनाथ या सहयोगी प्राध्यापकांनी संयुक्तरीत्या विकसित केले. उद्योग व समाजोपयोगी तंत्रज्ञान निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील संशोधन प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडावे, हा आमचा उद्देश आहे, असे डॉ. चांदगुडे यांनी स्पष्ट केले.

पेटंटमुळे विद्यापीठाच्या संशोधन क्षमतेला नवी ओळख

पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्याच्या राष्ट्रीय धोरणाशी हा शोध सुसंगत मानला जात आहे. ई-वाहनांचा वापर वाढल्यास इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जनात घट होऊ शकते. अशा पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि कार्यक्षम चार्जिंग तंत्रज्ञानाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.या पेटंटमुळे विद्यापीठाच्या संशोधन क्षमतेला नवी ओळख मिळाली असून, भविष्यात आणखी नाविन्यपूर्ण आणि उद्योगाभिमुख प्रकल्पांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT