मुंबई: जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या निकषात सुधारणा केल्यामुळे २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची पन्नास हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द केली.
त्यामुळे त्यांनाही ५० हजारांऐवजी २ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, सन २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी याला मंजुरी दिली.
कर्जमाफीतील या सुधारणांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात घोषणा केली होती, त्यानुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढली असून ती आजवरची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी योजना ठरणार आहे.
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही ऐतिहासिक योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेविषयी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’त ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजने’मध्ये ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्याची घोषणा केली होती.
तसेच, या शेतकऱ्यांनाही २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असे जाहीर केले होते. तसेच, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या योजनेच्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अपात्र शेतकरी पात्र
दुसरी जी अट होती २०२६-२७ चे पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील. ही अट काढून टाकलेली आहे. २०२५-२६ चे पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर मदत मिळणार आहे. यामुळे जे शेतकरी अपात्र झाले असते, ते पात्र झालेले आहेत. त्यामुळे ही देशातील आणि राज्यातील सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे. ५६ लाख शेतकऱ्यांकरिता ही कर्जमाफी जाहीर केली आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
३० जुलैआधी अंमलबजावणी : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
दरम्यान, येत्या ३० जुलै आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच, जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे. जे आयकर भरतात त्या मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही. ३० जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली जाणार आहे, असे ते म्हणाले.
दृष्टिक्षेपात कर्जमाफी
- ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ
- २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची पन्नास हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द, त्यामुळे त्यांनाही ५० हजारांऐवजी २ लाख रुपयांपर्यंत लाभ
- २०२६-२७ चे पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ही अट काढून टाकलेली आहे; २०२५-२६ चे पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर मदत; २३ लाख शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ