मुंबई : मुंबई महानगरपालिकेत जानेवारीअखेरपर्यंत प्रशासकराज संपुष्टात येऊन नवीन महानगरपालिका अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे तब्बल तीन वर्षानंतर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभागृहात नव्या अध्यक्षांपुढे सादर होणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे मतदान 15 जानेवारीला असून 16 जानेवारीला निकाल जाहीर आहे. त्यानंतर निवडून आलेल्या सर्वच पक्षांच्या नगरसेवकांचा एक गट तयार करून त्या त्या पक्षातर्फे गटनेत्याची नियुक्ती करण्यात येईल. नगरसेवकांचा गट तयार झाल्यानंतर त्याची नोंदणी कोकण आयुक्तांकडे केली जाईल. या सर्व प्रक्रियेला 10 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत महापौर व उपमहापौर निवडणुका होण्याची शक्यता आहे.
ही निवडणूक पार पडल्यानंतर महानगरपालिका सभागृहात स्थायी समितीसह अन्य समित्यांच्या सदस्य पदांवर, राजकीय पक्षांकडून बंद पॉकेटमध्ये आलेल्या नावांची घोषणा करण्यात येईल. समिती सदस्यांची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदा शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. त्यानंतर शिक्षण समितीचा अध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध सदस्य झाल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. या निवडणुकीनंतर अन्य समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने पार पडतील.
महापौर, उपमहापौर, विविध समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पार पडण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न राहणार आहेत. त्यामुळे 4 फेब्रुवारीला सादर होणारा मुंबई महानगरपालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष यांना सादर करतील. त्यानंतर स्थायी समिती या अर्थसंकल्पावर चर्चा झाल्यानंतर सभागृहात अर्थसंकल्प सादर करून त्याला अंतिम मंजुरी देण्यात येईल.
प्रशासक राजमध्ये बजेटची प्रक्रिया अशी पार पडली
मुंबई महापालिकेमध्ये 8 मार्च 2022 पासून प्रशासक राज असून प्रशासक असलेल्या आयुक्तांनी फेब्रुवारी 2023 मध्ये पहिल्यांदा महापालिका सभागृहात काही अधिकारी व पत्रकारांच्या उपस्थितीत अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे आयुक्तांकडे असलेल्या स्थायी समिती व महापालिका सभागृहाच्या अधिकारामुळे त्यांनीच अर्थसंकल्प मंजूर केला. सलग तीन वर्षे अशाच प्रकारे अर्थसंकल्प मंजूर झाला.