मुंबई: लालबागचा राजाला अंबानी समूहाचे पाठबळ मिळाल्यानंतर यावर्षी चिंचपोकळीचा चिंतामणीला अदानी समूहाने मदतीचा हात पुढे करत मंडळासोबत करार केला. यानिमित्ताने अदानी समूह मुंबईतील गणेशोत्सवात सहभागी झाला आहे. १०७ वर्षे जुने असलेले गिरणगावचे चिंतामणी मंडळ यामुळे आणखी प्रसिद्धीच्या झोतात येणार आहे.
चिंतामणीच्या वार्षिक आगमन यात्रेसाठी एक लाखाहून अधिक भाविक गर्दी करतात. यंदाची मिरवणूक २९ ऑगस्ट रोजी नियोजित आहे. अदानी समूहासोबतच्या भागीदारीमुळे आमच्या उत्सवाला अधिक भव्यता येणार आहे.
आम्ही आमच्या मंडपाची रचना तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर केली असून, हैदराबादच्या स्वर्णगिरी मंदिराची प्रतिकृती यावर्षी साकारणार आहोत, अशी माहिती चिंतामणी मंडळाचे उपाध्यक्ष प्रणीत पांचाळ यांनी दिली.
अदानी समूहाने जाहिरातीसाठी प्रायोजक म्हणून मंडळाशी संपर्क साधला. त्यानंतर मंडळासोबत करार करण्यात आला. मंडळाकडून गणेशोत्सवासोबतच वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांना आता बळ मिळणार आहे.
लालबागच्या राजालाही अंबानींची साथ
मुंबईतील आणखी एक प्रतिष्ठित गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही अंबानी कुटुंबाकडून देणगी स्वरूपात मदत मिळत असल्याचे यापूर्वी समोर आले आहे. रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांची मंडळाच्या मानद विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अनंत अंबानी यांचा मंडळाच्या विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये सहभाग राहिला आहे. त्यामुळे लालबागचा राजा मंडळाला मिळणारे अंबानी कुटुंबाचे पाठबळ आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीला मिळालेली अदानी समूहाची जाहिरात भागीदारी यामुळे मुंबईच्या पारंपरिक गणेशोत्सवाला उद्योगजगताची वाढती साथ अधोरेखित होत आहे.
गणेशोत्सवाला ‘कॉर्पोरेट टच’
मुंबईचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे मोठे व्यासपीठ बनला आहे. मोठ्या मंडळांच्या उत्सवात लाखो भाविक सहभागी होतात. त्यामुळे मंडप, सजावट, सामाजिक उपक्रम, प्रसिद्धी आणि व्यवस्थापनाच्या विविध स्तरांवर उद्योगसमूहांचा सहभाग वाढताना दिसत आहे.