मुंबई : राज्यात अनधिकृत अभ्यासक्रमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या वांद्रे येथील बळीराम हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या आवारात चालविण्यात येणाऱ्या अनधिकृत इंटिरिअर डिझाइन अभ्यासक्रमांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
या प्रकरणात तब्बल १३१ विद्यार्थ्यांकडून आकारलेले शुल्क ३० दिवसांच्या आत परत करण्याचे आदेश देण्यात आले असून संस्थाचालक आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईचे निर्देशही देण्यात तंत्रशिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
वांद्रे येथील बळीराम हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या परिसरात 'हिरे स्कूल ऑफ डिझाइन'च्या नावाखाली बीएससी/बी.व्होक. इन इंटिरिअर डिझाइनिंग हे अभ्यासक्रम आवश्यक मान्यता नसताना चालविले जात असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन करत महाविद्यालयावर कारवाई केली जावी, असा पवित्रा घेतला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस ॲड संतोष गांगुर्डे यांनी केलेल्या तक्रारीनंतर तंत्रशिक्षण संचालनालयाने याबाबत चौकशी केली. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि आर्थिक फसवणूक होत असल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.
याशिवाय संस्थाचालक प्रसाद हिरे, हिरे स्कूल ऑफ डिझाइनचे प्राचार्य सुनील मगदूम आणि संबंधित अभ्यासक्रम समन्वयक यांच्यावर प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या तिघांविरोधात अनधिकृत संस्था व अभ्यासक्रम प्रतिबंध अधिनियम, २०१३ अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मान्यता रद्द अथवा संस्था बंद करण्याची शिफारस का करू नये, याबाबत संस्थाचालकांकडून १५ दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे.
या आदेशामुळे अनधिकृत अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांना स्पष्ट आणि कठोर संदेश गेला आहे. भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी ही कारवाई दिशादर्शक ठरेल, असे ॲड. संतोष गांगुर्डे म्हणाले.
संचालनालयाने संबंधित अनधिकृत अभ्यासक्रम तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या १३१ विद्यार्थ्यांकडून आकारलेले शुल्क ३० दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश संस्थेला देण्यात आले आहेत. ही रक्कम प्रति विद्यार्थी अडीच लाख ते ९० हजार एवढी आहे. विद्यार्थ्यांना परताव्याची रक्कम मिळाल्याचा पुरावाही संचालनालयाकडे सादर करावा लागणार आहे.