मुंबई: औषधांच्या नावातील साधर्म्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन चुकीचे औषध वापरले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ॲसिडिटीवर सर्वाधिक वापरली जाणारी कॅडिला फार्मास्युटिकल्सच्या ॲसिलॉक १५०+ आणि ॲसिलॉक ३००+ या औषधांच्या राज्यातील सुमारे २ कोटी ४५ लाख रुपयांच्या साठ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
तसेच कंपनीला या औषधांचा बाजारातील उपलब्ध साठा तातडीने परत मागविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एफडीएच्या नियमित तपासणीत कंपनीची जुनी ॲसिलॉक 150 आणि ॲसिलॉक ३०० ही औषधे रॅटेडिन या सक्रिय औषधी घटकावर आधारित असल्याचे, तर नव्याने बाजारात आणलेल्या ॲसिलॉक १५०+ आणि ॲसिलॉक ३००+ या औषधांमध् हा पूर्णपणे वेगळा सक्रिय औषधी घटक वापरण्यात आल्याचे आढळले.
मात्र औषधाच्या नावात केवळ ‘+’ चिन्हाची भर घालून जवळपास समान ब्रँड नाव, लेबल आणि पॅकेजिंग ठेवण्यात आल्यामुळे डॉक्टर, औषध विक्रेते आणि रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचे एफडीएने स्पष्ट केले.
या प्रकरणात पुणे, नागपूर आणि भिवंडी (ठाणे) येथील कंपनीच्या मुख्य पुरवठा केंद्रांवर कारवाई करण्यात आली. पुण्यात ८९.४५ लाख, नागपुरात ९८.७१ लाख आणि भिवंडीत ५७.२० लाख रुपयांचा औषधसाठा विक्री-वितरणासाठी प्रतिबंधित करण्यात आला. एकूण कारवाईची रक्कम २.४५ कोटी रुपये इतकी आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, औषधांच्या नावातील साधर्म्यामुळे चुकीचे औषध रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा धोका सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर आहे.
सुरक्षित औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून औषधांचे ब्रँड नाव आणि सक्रिय औषधी घटक तपासूनच औषधांचा वापर व वितरण करावे, असे आवाहन प्रशासनाने डॉक्टर, औषध विक्रेते आणि नागरिकांना केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.