मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लुटीच्या हेतूने उत्तरप्रदेशमध्ये डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करून मुंबईत पळून आलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने गोरेगावमध्ये त्याला ताब्यात घेतले. मंगेशकुमार संग्राम यादव (२२) असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळून एक पिस्तुल जप्त केले आहे.
उत्तरप्रदेशमधील जलालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका डॉक्टरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्या करणारा आरोपी पिस्तुलासह वांद्रे परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष नऊला मिळाली होती. त्यानुसार कक्षाचे प्रमुख दया नायक यांच्या नेतृत्वातील पथकाने येथील रंगशारदा हॉटेलसमोर सापळा रचून यादवला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन गुन्हे शाखेने यादवला अटक केली आहे.
उत्तर प्रदेशमधील जौनपुरचा रहिवासी असलेल्या यादवच्या विरोधात उत्तर प्रदेशमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मारहाण करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, दंगल घडवून आणणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. लुटीच्या हेतूने डॉक्टरची हत्या केल्यानंतर तो मुंबईत पळून येऊन गोरेगावमधील राम मंदिर परिसरात लपून बसला होता.
हेही वाचा :