मुंबई: कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाविषयी माहिती दिली.  (छाया: दीपक सळवी)
मुंबई

CJP protest Mumbai : सीजेपीचे शिवाजी पार्कवर आज आंदोलन

परवानगी असो वा नसो, आंदोलन करणारच; अभिजीत दीपके यांचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पोलिसांची परवानगी असो वा नसो, २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करणारच, असा निर्धार कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी केला. या आंदोलनाची माहिती त्यांनी गुरुवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दीपके म्हणाले, या आंदोलनाची सुरुवात शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ येथे होणार असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईचे पोलीस हे दिल्ली पोलीस नाहीत. आम्ही शांततेत आंदोलन करू. या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांनी पक्षाचा झेंडा न घेता सहभागी व्हावे, असे आवाहन दीपके यांनी केले.

ते म्हणाले, मतदार यादीतील विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया थांबवावी, एसआयआर यादी रद्द करावी आणि २०२५च्या मतदार यादीच्या आधारेच निवडणुका घ्याव्यात. एसआयआर प्रक्रिया थांबवून २०२५ च्या मतदार यादीच्या आधारेच निवडणुका घेण्यात याव्यात.

निवडणूक आयोगाची भूमिका पारदर्शक असली पाहिजे. त्यासाठी आरोप होत असलेल्या ज्ञानेश कुमार यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. तसेच त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा, इत्यादी सीजेपीच्या प्रमुख मागण्या आहेत, असे दीपके म्हणाले.

मुंबईनंतर गोवा, बंगळुरू, पाटणा आणि रांची येथे आंदोलन करण्यात येणार असून पुढील टप्प्यात दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन केले जाणार आहे. शिक्षण, बेरोजगारी, आरक्षण आणि तरुणांच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. 'जेन झीला हवा तसा देश निर्माण व्हायला हवा, असे त्यांनी सांगितले.

लोकांच्या अपेक्षा खूप आहेत. आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे नाहीत. मात्र, सुरक्षित भारतासाठी आम्ही लढायला तयार आहोत. शिक्षणव्यवस्थेवर टीका करताना दीपके यांनी व्यवस्थापन कोटा का, आरक्षण का नको व सरकार उपलब्ध जागा विद्यार्थ्यांना का देत नाही, असे सवाल उपस्थित केले.

आधी शिवाजी पार्क, नंतर देशभर आंदोलन

आंदोलनाला परवानगी दिली होती का, हा प्रश्नच नाही. महात्मा गांधी यांनी आपल्या आंदोलनासाठी कधी ब्रिटिशांकडे परवानगी मागितली नाही. आम्हालाही परवानगी दिली नाही तरी आंदोलन करणारच आहोत. आम्ही केलेल्या यापूर्वीच्या आंदोलनासाठीही कधी परवानगी मागितली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT