अभिजात मराठीच्या बालवाड्या इतिहासजमा pudhari photo
मुंबई

Abhijat Marathi schools : अभिजात मराठीच्या बालवाड्या इतिहासजमा

गेल्या काही वर्षांत मुंबईतील मराठी माध्यमाच्या बालवाड्या झाल्या बंद

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नमिता धुरी

हजारो वर्षांचा इतिहास असलेली मराठी भाषा माथ्यावर अभिजाततेचा मुकुट घेऊन गेले वर्षभर मिरवत असताना याच भाषेतील पूर्व प्राथमिक शिक्षण मात्र इतिहासजमा होत आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईतील मराठी माध्यमाच्या बालवाड्या बंद झाल्या आहेत.

मराठी भाषा अभिजात असल्याचे केंद्र शासनाला पटवून देण्यात मराठीजन यशस्वी झाले आणि गतवर्षी 3 ऑक्टोबरला अभिजात दर्जा मराठीला जाहीर झाला. मात्र, तरी ही मायबोली कालसुसंगत ज्ञानभाषा असल्याचे मराठी पालकांना पटवून देण्यात आपल्याला अपयश आले आहे. इंग्रजी माध्यमाच्या खासगी प्लेग्रुप, नर्सरीची रोपटी मुंबईच्या गल्लीबोळात उगवली असून त्यांचेच पुढे इंटरनॅशनल स्कूल्समध्ये रुपांतर होत आहे.

दुसर्‍या बाजूला मराठी माध्यमाचे पूर्व प्राथमिक वर्ग अनुदानाअभावी बंद होत आहेत. या शाळांना ना राजाश्रय आहे ना लोकाश्रय. नव्या अभ्यासक्रम आराखड्यातही या शाळांचा विचार झालेला नाही. परिणामी, मराठी बालवाड्यांना राज्याच्या शैक्षणिक नकाशावर स्थानच मिळू शकलेले नाही.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार वयोगट 3 ते 8 या पायाभूत स्तरासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा एससीईआरटीने तयार केला. यात शिक्षकांसाठी 6 महिने आणि 1 वर्षाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हा आराखडा अनुदानित शाळांच्या पूर्व प्राथमिक वर्गांनाही लागू करावा, या वर्गांना अनुदान द्यावे, कार्यपुस्तिका द्यावी, शिक्षकांच्या मानधनवाढीसाठी निकष ठरवावेत, अशा मागण्या काही समिती सदस्यांनी केल्या होत्या; मात्र त्या मान्य झाल्या नाहीत. शासनाने तयार केलेले प्रशिक्षण केवळ अंगणवाड्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू आहे. खासगी मराठी बालवाड्यांची नोंदणी करणे अनिवार्य असले तरी त्यांना अनुदान, प्रशिक्षण, अभ्यासक्रम मिळत नाही. अंगणवाडी व्यवस्था शैक्षणिकदृष्ट्या भक्कम नसल्याने मध्यमवर्गीय मुले तेथे जात नाहीत.

कोणत्या बालवाड्या बंद ?

आयईएस संस्थेच्या दादर, अ‍ॅशलेन, वांद्रे, मरोळ, भांडुप, मुलुंड, चारकोप येथील मराठी शाळांचे पूर्व प्राथमिक वर्ग गेल्या काही वर्षांत बंद झाले. डोंबिवली, बदलापूर येथील वर्ग सुरू आहेत. पार्ले-टिळक विद्यालयाची स्वत:ची बालवाडी नाही. शाळेच्या परिसरात अनेक बालवाड्या होत्या. ताराबाई गदक, राधाबाई, पन्नालाल लोहे डे केअर या बालवाड्या बंद झाल्या. पार्लेश्वर सोसायटीच्या बालवाडीला उदंड प्रतिसाद मिळत होता. सोसायटीतील मुले इंग्रजी शाळेत शिकू लागली व बालवाडीत केवळ बाहेरचीच मुले येऊ लागली तेव्हा ही शाळा बंद झाली.

सोसायटीबाहेर जागा मिळवण्याचा प्रयत्न संस्थेने केला मात्र जागेचे भाडे न परवडल्याने ते शक्य झाले नाही. रमाबाई परांजपे बालवाडीमध्ये पूर्व प्राथमिकच्या तीन इयत्तांचे प्रत्येकी 8 वर्ग होते. तेथे केवळ 1 वर्ग उरला आहे. इतर सर्व वर्ग आयसीएसईचे आहेत. परिणामी, पार्ले-टिळक प्राथमिक शाळेतील मराठी माध्यमाचे विद्यार्थीही कमी झाले आहेत. चारकोपच्या एकवीरा शाळेची बालवाडी बंद करण्याचा निर्णय झाला होता. पालकांच्या दबावामुळे प्रवेश सुरू झाले. सध्या एकाच वर्गखोलीत दोन सत्रांमध्ये वर्ग भरतात. यासाठी एकच शिक्षिका आहेत. याबाबत बोलण्यासाठी संस्थेकडून कोणीही उपलब्ध झाले नाही.

बालवाड्या बंद होण्याची कारणे

  • खासगी इंग्रजी शाळांतील 25 टक्के राखीव प्रवेश व पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमुळे मोफत इंग्रजी माध्यमाचा पर्याय मिळाल्याने झोपडपट्ट्यांमधील पालकही मराठी शाळांकडे फिरकत नाहीत.

  • बालवाड्यांना अनुदान मिळत नाही. इंग्रजी शाळांप्रमाणे मराठी शाळा प्रचंड शुल्क आकारत नाहीत. परिणामी वीज, पाणी, शिपाई, शिक्षक या गोष्टी परवडेनाशा होतात.

  • राज्य अभ्यासक्रम आराखड्यातही खासगी मराठी बालवाड्यांचा विचार झालेला नाही.

  • दक्षिण मुंबईतील जुन्या चाळींचा पुनर्विकास झाल्यानंतर तेथील सामान्य मराठी कुटुंबे मुंबईबाहेर गेली. उच्चभ्रू पालकांची मानसिकता मराठीसाठी अनुकूल नाही. इंग्रजी माध्यमाकडे कल असल्याने मराठी बालवाड्यांची विद्यार्थी संख्या रोडावली.

रमाबाई परांजपे बालवाडीत मराठीसाठी एकच वर्ग आहे. तेथे प्रवेश मिळत नाही तेव्हा पालक आमच्याकडे विचारणा करतात. मात्र पार्ले-टिळक शाळेत पूर्व प्राथमिक वर्ग नसल्याने थेट पहिलीलाच प्रवेश घेता येतो. मराठी बालवाड्यांना शासनाने अनुदान व जागा द्यावी. पालिका शाळांचे रिकामी वर्ग बालवाडी चालवण्यासाठी द्यावेत.
माधुरी जोशी, शिक्षिका, पार्ले-टिळक विद्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT