मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद तसेच 100 टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट’ (आभा) कार्ड काढणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना आदेश जारी करत संबंधित कर्मचाऱ्यांची तत्काळ नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शासनाच्या ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ तसेच ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनांअंतर्गत प्रतिवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत मिळण्यास मोठा आधार मिळणार आहे.
शिक्षण संचालनालयाने काढलेल्या पत्रात सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने ‘आभा’ कार्ड तयार करून घ्यावे, असे नमूद केले आहे. कार्ड न काढल्यास भविष्यात आरोग्य योजनांच्या लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याकडे पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा
‘आभा’ कार्ड तयार करण्यासाठी केंद्र शासनाच्या डिजिटल हेल्थ मिशनच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारे ओटीपी पडताळणी करून काही मिनिटांत कार्ड तयार होणार आहे. कार्ड तयार झाल्यानंतर 14 अंकी ‘आभा’ क्रमांक मिळणार असून, तो पीडीएफ स्वरूपात डाउनलोडही करता येणार आहे. सरकारी रुग्णालयातील ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ मध्ये ऑफलाईन नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना तेथे आधार कार्डच्या साहाय्याने ‘आभा’ कार्ड तयार करून दिले जाणार आहे.