मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने “केजरीवालची गॅरंटी” नावाने आपला जाहीरनामा सादर केला आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी मुंबईत हा जाहीरनामा सादर केला. “इतकी संपन्न मुंबई असूनही सामान्य माणसाला मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागतं,” असा थेट सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. AAP यावेळी मुंबईत सर्व २२७ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
या जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू सामान्य मुंबईकर आहेत. प्रत्येक घराला दरमहा २० हजार लिटरपर्यंत मोफत आणि स्वच्छ पाणी देणं, पाणीगळती थांबवून संपूर्ण जलव्यवस्था सुधारणं आणि सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे. यासोबतच २०० युनिटपर्यंत मोफत वीज, मोफत मीटर आणि सौर ऊर्जेच्या वापरावर भर दिला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये राबवलेल्या मॉडेलवर त्यांनी हे आश्वासन दिलं आहे.
BMC शाळांचं रूप बदलण्याचं आश्वासन देत प्रत्येक शाळेसाठी १ कोटी रुपयांचा निधी, आधुनिक सुविधा, विद्यार्थ्यांना मोफत बस पास आणि शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्यासाठी १,००० मोहल्ला क्लिनिक सुरू करून मोफत तपासणी, औषधे आणि चाचण्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे.
BMC वर थेट टीका
आतिशी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे प्रचंड पैसा असूनही शिक्षण, आरोग्य आणि नागरी सेवांची अतिशय दयनीय अवस्था आहे. AAPच्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांच्या मते, स्वच्छता, वाहतूक, महिला सक्षमीकरणासोबतच पारदर्शक कारभार हे पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.