Raj Thackeray News Hindi Marathi Language Row
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध कथित भाषण आणि हिंदी भाषेवरुन नागरिकांवरील कथित हल्ल्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. हिंदी भाषिकांविरुद्ध हिंसाचार भडकवणे आणि भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी उपाध्याय यांनी केली आहे.
त्यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे याआधीच तक्रार दाखल केली होती. पण त्याची दखल घेतली नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या याचिकेत ५ जुलै रोजी झालेल्या विजयी मेळाव्याचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. या मेळाव्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, या मेळाव्यात राज ठाकरे यांनी कथितपणे म्हटले होते की जे मराठी बोलत नाहीत त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे. असे वक्तव्य हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे आणि संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांचे हे वक्तव्य मराठी भाषेबद्दल असलेल्या प्रेमापोटी नव्हे तर ते आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावाही उपाध्याय यांनी त्यांच्या याचिकेतून केला आहे. राज ठाकरे हेतुपुरस्सर समुदायांमध्ये शत्रुत्व पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राज ठाकरे यांची ही वक्तव्ये आणि कृती देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारी आहे. हा भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १५२ नुसार दंडनीय गुन्हा आहे, असेही याचिकेत नमूद केले आहे.
राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला कोणताही हिंसाचार आणि मॉब लिंचिंग विरोधात कठोर कारवाई करण्याचे तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठीचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी मागणीही उपाध्याय यांनी केली आहे.