मुंबई, पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौर्याच्या सुरक्षा बैठक झाली होती. या बैठकीत उपस्थित राहून नंतर पळून गेलेल्या रामेश्वरप्रसाद दयाशंकर मिश्रा नावाच्या एका लष्कारी जवानाला वनराई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर कोर्ट मार्शलची कारवाई सुरु असून तो बीकेसी येथील नरेंद्र मोदी यांच्या सभेलाही उपस्थित होता. असे तपासात उघडकीस आले आहे.
त्यासाठी त्याने बोगस आय कार्ड बनवून व्हीव्हीपीआयमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश वरिष्ठांकडून वनराई पोलिसांना देण्यात आले आहे. शनिवारी (दि.13) नरेंद्र मोदी हे विविध लोकार्पणाच्या कार्यक्रमानिमित्त मुंबईत येत आहे. काही दिवसांपूर्वी या दौर्यासंदर्भात सुरक्षा आढावा घेण्यासाठी गोरेगाव येथील नेस्को येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या बैठकीला एसपीजी महासंचालकाच्या अध्यक्षेखाली विविध सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रामेश्वरप्रसाद हा अधिकारी असल्याची बतावणी करुन वावरत होता. हा प्रकार एका संरक्षण विभागाच्या अधिकार्याच्या लक्षात येताच, त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो नेस्को गेट क्रमांक दोनमधून रिक्षा पकडून पळून गेला . या घटनेनंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. ही शोधमोहीम सुरु असताना बुधवारी (दि.10) रामेश्वरप्रसाद मिश्रा याला नवी मुंबईतील ऐरोली परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला गुरुवारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यावेळी न्यायालयाने त्याल पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश वरिष्ठांकडून वनराई पोलिसांना देण्यात आले आहे. आतापर्यंच्या चौकशीत रामेश्वरप्रसाद हा गेल्या वर्षी बीकेसी येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेला व्हीव्हीआयपी विभागात उपस्थित होते. त्यासाठी त्याने बोगस आय कार्ड बनविले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरुद्ध कोर्ट मार्शलची कारवाई सुरु करण्यात आली होती. ही कारवाई सुरु असताना तो गोरेगाव येथील सुरक्षा बैठकीला हजर होता. यामागे त्याचा काय उद्देश होता, त्याला तसे करण्यास कोणी प्रवृत्त केले होते का याचा पोलीस तपास करत आहेत.