Sadanand Karandikar Donation 
मुंबई

Sadanand Karandikar Donation| वृद्धाश्रमातील ८२ वर्षीय सदानंद करंदीकर यांची २० लाखांची उदात्त देणगी

Sadanand Karandikar Donation| मानवतेचा खरा अर्थ काय असतो हे दाखवून देणारा एक अत्यंत प्रेरणादायी आणि मनाला स्पर्शून जाणारा प्रसंग नुकताच घडला.

shreya kulkarni

मानवतेचा खरा अर्थ काय असतो हे दाखवून देणारा एक अत्यंत प्रेरणादायी आणि मनाला स्पर्शून जाणारा प्रसंग नुकताच घडला. नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात राहणारे ८२ वर्षीय सदानंद विष्णू करंदीकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधी आणि पंतप्रधान सहायता निधीला प्रत्येकी १० लाख रुपयांची देणगी देत समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे.

सदानंद करंदीकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा गावचे असून, खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. अपत्य नसल्यामुळे ते आणि त्यांची पत्नी शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या श्रीमती सुमती करंदीकर यांनी आनंद वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात श्रीमती करंदीकर यांचे कर्करोगामुळे दुःखद निधन झाले.

पत्नीच्या आजारपणाच्या काळात, सदानंद करंदीकर यांनी रुग्णालयांमध्ये कर्करोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक चणचण, धावपळ आणि वेदना जवळून अनुभवल्या. या अनुभवातून त्यांनी एक निर्णय घेतला पत्नीच्या स्मरणार्थ काहीतरी समाजोपयोगी करायचं. आणि त्यातूनच आज त्यांनी एकूण २० लाख रुपयांची देणगी दिली.

आज सकाळी डोंबिवलीहून लोकलने प्रवास करून, नंतर बसने मंत्रालयात आलेले सदानंद करंदीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट धनादेश सुपूर्त केला. एकीकडे वृद्धत्व, दुसरीकडे सामाजिक बांधिलकीची जाणीव हे दृश्य उपस्थित सर्वांचे मन हेलावणारे ठरले.

सदानंद करंदीकर यांना अध्यात्म, देवभक्ती आणि शेतीत विशेष रस आहे. सध्या ते त्यांच्या बहिणीकडे प्रभा श्रीराम शितूत राहतात. सामाजिक जाणिवांनी समृद्ध असलेले करंदीकर हे उदाहरण आहे की माणूस वयाने वृद्ध होतो, पण मनाने जर तरुण राहिला तर तो समाजासाठी दीपस्तंभ ठरतो. त्यांची ही दानशूरता केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर ही एक प्रेरणा आहे. समाजात कोणत्याही वयात, कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक बदल घडवण्याची.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT