viral video
मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या मुंबईतील असाच एक व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, मुंबईच्या रस्त्यावर नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक ७ वर्षांची चिमुकली आपल्या वडील आणि आजीसोबत लिंबू सरबत विकताना दिसते. पण ही गोष्ट केवळ एका लहान मुलीच्या व्यवसायापुरती मर्यादित नाही, तर तिच्या वडिलांनी दिलेल्या शिकवणीमुळे आणि समाजातील विविध प्रतिक्रिया उमटल्यामुळे हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.
व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला लिंबू सरबत विकणाऱ्या एका सात वर्षांच्या मुलीला पाहतो. कुतूहलाने ती व्यक्ती मुलीच्या वडिलांशी संवाद साधतो. तेव्हा वडील हसून उत्तर देतात, "तुम्ही 'रिच डॅड पुअर डॅड' (Rich Dad Poor Dad) हे पुस्तक वाचलं आहे का?" ते पुढे सांगतात की, ते दोघे मिळून हे पुस्तक वाचत आहेत आणि त्यातून मिळालेले धडे ते आपल्या मुलीला प्रत्यक्ष अनुभवातून शिकवत आहेत. लहान वयातच स्वप्न पाहणे, काहीतरी उभे करणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे ते तिला पटवून देत आहेत. वयाच्या सातव्या वर्षीच ही मुलगी आर्थिक स्वातंत्र्याचे धडे गिरवत आहे.
ही पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीने अशा पालकांचे कौतुक करत म्हटले आहे की, "आपल्याला अशाच पालकांची गरज आहे, जे मुलांना केवळ मार्कांसाठी नाही, तर विचार करायला, नवनिर्मिती करायला आणि स्वतःच्या भविष्याची सूत्रे हाती घ्यायला शिकवतात."
मात्र, या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच, अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओमधील एका वेगळ्याच गोष्टीकडे लक्ष वेधले आणि या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले. व्हिडिओमध्ये लिंबू सरबत विकणाऱ्या मुलीसमोर आलेल्या इतर दोन लहान मुली पोटाची खळगी भरण्यासाठी फुगे विकताना दिसत होत्या. या दृश्यामुळे सोशल मीडियावर एक नवी चर्चा सुरू झाली.
एका युझरने लिहिले, "हा विरोधाभास आहे. त्याच फ्रेममध्ये दोन लहान मुले पोटासाठी फुगे विकत होती. पण इंग्रजी बोलणाऱ्या आणि चांगल्या घरातील मुलीला प्रसिद्धी मिळाली. ही वसाहतवादी मानसिकतेचा प्रकार आहे," असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. दुसऱ्याने थेट प्रश्न विचारला, "फुगे विकणारी मुलेही तेच करत होती. तुम्ही त्यांचे फोटो का नाही काढले? ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे, त्यांना मदत का नाही केली?" एका प्रतिक्रियेने तर सर्वांचे लक्ष वेधले, "एकाच फ्रेममध्ये प्रयोगासाठी व्यवसाय आणि पोटासाठी व्यवसाय!"