7 MLAs from Nagaland quit Ajit Pawar's faction
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला नागालँडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी पक्षाची साथ सोडत थेट सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असणार्या राष्ट्रवादीचे तेथील अस्तित्व धोक्यात आले आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) चे सरकार पूर्ण बहुमतात आले आहे.
नागालँडमध्ये 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चांगले यश मिळवले होते. एनडीपीपीला 25 आणि भाजपला 12, ते राष्ट्रवादीला या निवडणुकीत 7 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादीचे अस्तित्व दिसून आले होते.
आता अजित पवार गटाच्या या 7 आमदारांच्या गटाने सत्ताधारी एनडीपीपीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून त्यास विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. या आमदारांमध्ये टेनिंगचे नम्री न्चांग, अटोइझूचे पिक्टो शोहे, वोखा टाउनचे वाय म्होनबेमो हुम्त्सो, मोन टाउनचे वाय मानखाओ कोन्याक, लोंगलेंगचे ए पोंगशी फोम, नोकलाकचे पी लोंगोन आणि सुरुहोतोचे एस तोइहो येप्थो यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव यांनी बाहेर पडलेल्या आमदारांशी संपर्क साधून त्यांची बाजू ऐकणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या पक्ष बदलाविरोधात कायद्यातील तरतुदींनुसार आणि इतर कायदेशीर प्रक्रियेंतर्गत चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
मला ते आमदार दोन-तीन महिन्यांपूर्वी भेटायला आले होते, त्यांची तिथे अजिबात कामे होत नव्हती, मी त्याबाबत तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो, त्यांच्यात अस्वस्थता होती. मी त्याबद्दल अधिकची माहिती घेत आहे, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी यासंदर्भात स्पष्ट केले.