मुंबई : राज्यात गेल्या सहा वर्षांत मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस या साथीच्या आजारांनी तब्बल ३७२ जणांचा बळी घेतल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. २०२० ते २०२५ या कालावधीतील आकडेवारीनुसार १३६ जणांचा मृत्यू निश्चित स्वरूपात, तर २३६ जणांचा संशयित मृत्यू म्हणून नोंदविण्यात आला आहे.
या तिन्ही आजारांमध्ये लेप्टोस्पायरोसिस सर्वाधिक जीवघेणा ठरला आहे. या आजारामुळे ७५ निश्चित आणि ११० संशयित असे एकूण १८५ मृत्यू झाले आहेत. डेंग्यूमुळे ४२ निश्चित व ७९ संशयित असे १२१ मृत्यू, तर मलेरियामुळे १९ निश्चित आणि ४७ संशयित अशा एकूण ६६ मृत्यूंची नोंद झाली आहे.
२०२३ पासून संशयित मृत्यूंची स्वतंत्र नोंद सुरू झाल्यानंतर साथीच्या आजारांचे गांभीर्य अधिक स्पष्ट झाले आहे. २०२४ मध्ये लेप्टोस्पायरोसिसमुळे सर्वाधिक २२ निश्चित मृत्यू नोंदविण्यात आले, तर २०२३ मध्ये डेंग्यूमुळे १४ निश्चित मृत्यू झाले होते. २०२० ते २०२२ या कालावधीत संशयित मृत्यूंची स्वतंत्र नोंद नसल्याने प्रत्यक्ष मृतांचा आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्याची गरज आहे. वेळेत निदान, तातडीचे उपचार आणि प्रभावी जनजागृती यामुळेच साथीच्या आजारांमुळे होणारे मृत्यू टाळता येतील, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मागविलेल्या माहितीतून समोर आली आहे. मात्र, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक संशयित मृत्यूची समितीकडून सखोल छाननी करूनच अंतिम आकडेवारी निश्चित केली जात असल्याचे स्पष्ट केले.