मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  CMO X Photo
मुंबई

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांसाठी ३०५ कोटींच्या आराखड्यांना मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज (दि. २४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. (Maharashtra Pilgrimage Development)

‘अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे आपण राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी आपण भरीव निधी उपलब्ध करून देत आहे. त्याप्रमाणे या तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. यासर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत, याची काळजी घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले. (Maharashtra Pilgrimage Development)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर थीमपार्क

भगूर (जि. नाशिक) येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क साकारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या चाळीस कोटी रुपयांच्या प्रस्तावास तसेच पहिल्या टप्प्यातील 15 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. अमळनेर (जि. जळगाव) येथील देशातील एकमेद्वितीय अशा मंगळग्रह देवस्थानाच्या 25 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. सातरा जिल्ह्यातील कोयना जलाशय-मौजे मुनावळे येथील जलक्रीडा पर्यटन सुविधा (ता.जावळी, जि.सातारा)साठी 47 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली. हे सर्व प्रस्ताव पर्यटन विभागाने सादर केले. त्याबाबत सविस्तर सादरीकरण व त्यातील प्रकल्प आणि सुविधांची माहिती सादर केले.

लक्ष्मीनारायण शिवमंदिर- नंदनवनसाठी 24 कोटी 73  

याशिवाय नगर विकास विभागाने नागपूर शहरातील आराखडे सादर केले. त्यातील लक्ष्मीनारायण शिवमंदिर- नंदनवनच्या 24 कोटी 73 लाखांच्या विकास आराखड्यास, कुत्तेवालेबाबा मंदिर आश्रम-शांतीनगरसाठी 13 कोटी 35 लाख रुपये आणि मुरलीधर मंदिर पारडी विकास आराखड्यासाठी 14 कोटी 39 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली.

संत गाडगेबाबा कर्मभूमी ऋणमोचन येथील 18 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता

ग्रामविकास विभागाने सादर केलेल्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी ऋणमोचन येथील 18 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच श्री क्षेत्र गहिनीनाथगड (जि. बीड) च्या विकास आराखड्यातील 2 कोटी 67 लाखांच्या कामांस मान्यता देण्यात आली. याशिवाय मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब या सशस्त्र दहशतवाद्यास जीवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या सातारा जिल्ह्यातील केंडबे (ता. जावळी) येथील मुळगांवी स्मारक उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीसाठी बैठकीत मान्यता देण्यात आली.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार समाधान अवताडे, आमदार सरोज अहिरे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, सोलापुरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते. जळगाव, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT