मुंबई ः यंदा राज्यात अभियांत्रिकी पदवीचे विक्रमी प्रवेश झाले असले तरी अभियांत्रिकीसाठी सीईटी देत 95 ते 100 पर्सेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 322 विद्यार्थ्यांनी कॅप फेऱ्यांमध्ये प्रवेशच घेतला नाही. तर 85 ते 95 पर्सेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 661 विद्यार्थ्यांनी कॅप फेरीत प्रवेश घेतला नाही. तर 85 ते 100 पर्सेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 972 विद्यार्थ्यांनी राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला नसल्याचे दिसून आले आहे.
अभियांत्रिकी क्षेत्रातील करियरचा दबदबा गेल्या तीन वर्षात पुन्हा वाढलेला आहे. नोंदणीप्रमाणे सीईटी परीक्षेतही विद्यार्थ्यांनी जोरदार गुण मिळवले आहेत. या मुळे नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असते. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील जेईई मुख्य आणि ॲडव्हान्स्ड अशा दोन परीक्षा होतात. तर राज्य पातळीवर सीईटी (पीसीएम) ही परीक्षा होते. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधून एनआयटी, आयआयआयटी आणि आयआयटी अशा संस्थांसाठीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. तर सीईटीद्वारे राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश होतात.
यात जेईई परीक्षा देणारे विद्यार्थी अनेकदा सराव म्हणून, तर कधी दुसरा पर्याय म्हणून सीईटी परीक्षाही देतात. यंदा 4 लाख 22 हजार 663 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली. त्यापैकी 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले. तर 90 ते 99.99 पर्सेंटाइल मिळवणाऱ्यांमध्ये 43 हजार 299 विद्यार्थ्यांचा समावेश होता. 95 ते 100 पर्सेंटाइल मिळवणाऱ्या 1 हजार 322 विद्यार्थ्यांनी राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळावे कॅप फेरीत प्रवेश घेतला नाही. पण यापैकी 159 विद्यार्थ्यांनी अ-कॅप फेरीत आणि 67 विद्यार्थ्यांनी संस्थात्मक फेरीत प्रवेश घेतले. 85 ते 95 या पर्सेंटाइल मिळवलेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 661 विद्यार्थी कॅप फेरीत प्रवेशाविनाच होते. त्यापैकी 469 जणांनी अ-कॅप फेरीत आणि 326 विद्यार्थ्यांनी संस्थात्मक फेरीत प्रवेश निश्चित केले आहेत.