

मुंबई : राजेश सावंत
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या हेरिटेज इमारतीमध्ये मांजरांनी संसार थाटला आहे. सुमारे 50 ते 60 पेक्षा जास्त मांजरांचा वावर या ठिकाणी असून त्यांचे कुटुंब दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महापालिकेत असलेली कॅन्टीन व कर्मचाऱ्यांच्या डब्यातील अन्न खाऊन ही मांजरे चांगली धष्टपुष्ट झाली आहेत.
मांजर व मानवाचे प्रेम हे जुनेच आहे. त्यामुळे एक वेळेस कुत्र्याला जेवण घरापर्यंत प्रवेश नसला तरी, मांजरांना थेट प्रवेश दिला जातो. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातही मांजरानी ठिकठिकाणी आपला संसार थाटला आहे. वर्ष-दोन वर्षांपूर्वी मांजरांची संख्या कमी होती. पण आता ही संख्या 50 ते 60 पेक्षा जास्त झाली आहे. ही मांजरे सतत कर्मचाऱ्यांभोवती फिरत असल्यामुळे ती पूर्णपणे माणसाळलेली आहेत. त्यामुळे सकाळी दहा वाजता कर्मचारी मुख्यालयात आल्यानंतर या मांजरांचाही वावर सुरू होतो. रात्रीच्या वेळी ही मांजरे कुठल्या ना कुठल्या मजल्यावरील आडोशाला जाऊन, आराम करताना दिसून येतात. अगदी खुर्ची, टेबलांवरही.
मुख्यालयातील अनेक मांजरांनी पिल्लांना जन्म दिल्यामुळे त्यांची संख्याही वाढू लागली आहे. मुख्यालयात सहज फेरफटका मारला तरी ठिकठिकाणी मांजरे दिसून येतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मांजरांची भरती तर केली नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या हेरिटेज ब्रिटिशकालीन इमारतीमध्ये मांजरांना संसार थाटायला मिळणे म्हणजे नशीबच म्हणावे लागेल.
मंत्रालयातही वावर
मंत्रालयातही मांजरांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येत आहे. येथेही प्रत्येक मजल्यावर मांजरे दिसून येतात. पण येथेही मांजरांना कोणीच रोखत नाही. उलट येथे असलेल्या कॅन्टीनमधले उरलेले अन्नपदार्थ व कर्मचाऱ्यांच्या डब्यातील उरलेले अन्न खाऊन ही मांजरे धष्टपुष्ट झाली आहेत.
महापालिका प्रशासनाचाही कानाडोळा
मुंबई महानगरपालिकेने भटक्या मांजरांची संख्या रोखण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीपेक्षा मांजरांच्या निर्बिजीकरण व लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी सुमारे 10 हजार भटक्या मांजरांचे निर्बिजीकरण व लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पण महापालिका मुख्यालयामध्ये मांजरांचा उघडपणे वावर असतानाही पालिका प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे.