मुंबई : चंदन शिरवाळे
प्रवासी संख्येत घट, इंधन दरवाढ, कर्मचाऱ्यांचे जादा वेतन, जुन्या बसेसच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च अशी विविध कारणे दाखवून बेस्ट तोट्यात दाखवली जात आहे. प्रत्यक्षात बेस्टमध्ये 2007 ते 2010 या तीन वर्षांच्या कालावधीत तब्बल 2 हजार 289 कोटी 84 लाख 46 हजार 641 रुपयांचा तिकीट घोटाळा झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. अशा घोटाळ्यांमुळे बेस्टचा तोटा 12 हजार कोटींपर्यंत पोहोचला होता. मुंबई महानगरपालिकेने आर्थिक सहाय्य केल्यामुळे हा तोटा 8 हजार कोटींपर्यंत खाली आला होता.
मुंबईची लोकवाहिनी अशी ओळख असलेल्या बेस्टचे सध्या 25 आगारे आहेत. मुंबईत या उपक्रमाचे 500 बसमार्ग होते. परंतु बसेसच्या संख्येत घट झाल्यामुळे त्यांची संख्या आता 420 मार्गांवर आली आहे. या मार्गांवर सध्या, मर्यादित, वातानुकूलित आणि प्रासंगिक बसच्या माध्यमातून सेवा दिल्या जातात. बेस्टमध्ये 24 हजार कर्मचारी असून त्यांच्या वेतनावर दरमहा 164 कोटी खर्च येतो.
मुंबईसारख्या शहरातील प्रवासी वाहतूक सेवेची संधी मिळालेली बेस्ट नफ्यात असणे आवश्यक होते. पण 1971 पासून ते आतापर्यंत तिकीट विक्रीतून आलेल्या कोट्यवधी रुपयांचा अपहार होत असावा, अशी शंका एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. यामध्ये तत्कालीन आगार कॅशियर, कुलाबा येथील कॅश रिसिव्हर, लेखा विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असावा, असेही बोलले जात आहे.
मुंबईत बेस्टचे 25 आगार होते. त्यामध्ये अलीकडे 2 आगारांची भर पडली आहे. हे नवीन दोन आगार वगळता 2007 ते 2010 या कालावधीतील विविध प्रकारची तिकीटे, दैनंदिन पास विक्रीतून आलेली रक्कम आणि बेस्टच्या वार्षिक ताळेबंदातील प्रचंड तफावत असलेली आकडेवारी माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी दिली आहे.
कोण होते कारभारी?
मुख्यमंत्री विलासराव देशमुख - 2007-2008
अशोक चव्हाण - 2008 ते 2010
बेस्ट चेअरमन संजय पोतनीस - 2007 ते 2010
परिवहनमंत्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक - 2007 ते 6 नोव्हेंबर 2009
राधाकृष्ण विखे-पाटील - 7 नोव्हेंबर2009 ते 10 नोव्हेंबर 2010
उत्तमराव खोब्रागडे बेस्ट चेअरमन- 28 जून 2006 ते 2 जून 2010
बेस्टच्या साध्या, मर्यादित, वातानुकूलित, इतर
बसेसची तिकीट विक्री (मूल्य रु.1 ते 44.85 पैसे)
एप्रिल 2007 ते मार्च 2008
तिकीट विक्री ः 289 कोटी 12 लाख 54 हजार 824 रुपये
रक्कम ः 1हजार 608 कोटी 59 लाख 10 हजार 373 रुपये
बेस्ट वार्षिक अहवाल ः 854 कोटी 88 लाख 76 हजार 132 रुपये
खर्च ः 1 हजार 226 कोटी 69 लाख 41 हजार 394 रुपये
एप्रिल 2008 ते मार्च 2009
तिकीट विक्री ः 225 कोटी 06 लाख 24 हजार 202 रुपये
रक्कम ः 1 हजार 652 कोटी 07 लाख 40 हजार 415 रुपये
बेस्ट वार्षिक अहवाल ः 893 कोटी 98 लाख 73 हजार 041 रुपये
खर्च ः 1 हजार 304 कोटी 80 लाख 45 हजार 332 रुपये
एप्रिल 2009 ते मार्च 2010
तिकीट विक्री ः 209 कोटी 90 लाख 12 हजार 624 रुपय
रक्कम ः 1 हजार 704 कोटी 72 लाख 34 हजार 397 रुपये
बेस्ट वार्षिक अहवाल ः 926 कोटी 66 लाख 89 हजार 371 रुपये खर्च ः 1 हजार 431 कोटी 55 लाख 25 हजार 478रुपये
अहवालातील वार्षिक खर्च : 3 हजार 963 कोटी 05 लाख 12 हजार 204 रुपये ही रक्कम खर्च झाले असेल तर 1 हजार 002 कोटी 33 लाख 72 हजार 981 रुपये गेले कुठे असा प्रश्न निर्माण होतो.
तीन वर्षांचे एकूण उत्पन्न : 4 ,965 कोटी 38 लाख 85 हजार 185 रु.
वार्षिक अहवाल रक्कम : 2, 675 कोटी 54 लाख 38 हजार 544 रु.
एकूण घोटाळा रक्कम ः 2 ,289 कोटी 84 लाख 46 हजार 641 रु.
2007 ते 2010 या कालावधीत 7 हजार 24 कोटी 08 लाख 91 हजार 652 रुपये तिकीट विक्री झाली आहे, तर वार्षिक अहवालात 2 हजार 675 कोटी 54 लाख 38 हजार 544 रुपये दिसत आहेत. यावरून 2 हजार 289 कोटी 84 लाख 46 हजार 641 रुपये घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते.
या तीन वर्षांच्या अहवालात 3 हजार 963 कोटी 5 लाख 12 हजार 204 रुपये खर्च झाल्याचे दर्शविण्यात आले आहे.
मूळ उत्पन्नातून खर्चाची वरील रक्कम वजा केल्यास 1 हजार 2 कोटी 33 लाख 72 हजार 981 रुपये उरतात. मग हे पैसे गेले कुठे, असाही प्रश्न निर्माण होत आहे.
1994 ते 2010 या कालावधीत पोलीस विभागाला बसेस पुरविल्याच्या बदल्यात बेस्टला 53,18,99,696 रुपये प्राप्त झाले आहेत. या रकमेचाही वार्षिक अहवालात उल्लेख नाही. या रकमेचा छडा लावण्याचा आतापर्यंत एकाही बेस्ट महाव्यवस्थापकाने प्रयत्न केला नसल्याचे दिसते.
बेस्ट कधीही तोट्यात नसते. फक्त पेपरवर तोटा दाखवला आहे. यामध्ये बेस्टचे मोठे अधिकारी, राजकीय पक्ष आणि नेत्यांचाही सहभाग असू शकतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एस.आय.टी स्थापना करून सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी.मनोरंजन रॉय, माहिती अधिकार कार्यकर्ते.