मुंबई : मलाच उमेदवारी मिळणार..असे गृहीत धरून, माजी नगरसेवकांसह इच्छुकांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच निवडणूक हमीपत्र तयार करण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. यासाठी सर्व कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक कागदपत्र सादर करावी लागतात. एवढेच नाही तर त्यासाठी हमीपत्रेही द्यावी लागतात. बँक खात्यात असलेल्या पैशांसह घर, जमीन व अन्य मालमत्ता, मुदत ठेवीची प्रमाणपत्रे हमीपत्रसह सादर करावी लागतात. उमेदवाराच्या गावातील कौटुंबिक जमिनी बद्दलही उल्लेख करावा लागतो उमेदवार आरक्षणामध्ये येत असला तर त्याचे आरक्षण प्रमाणपत्र सादर करण्यासह शैक्षणिक प्रमाणपत्र सादर करणे ही बंधनकारक आहे.
पत्नीच्या नावे असलेली संपत्ती, वाहने, मुलांची संख्याही जाहीर करावी लागते. आपल्यावर कोणता गुन्हा नाही याचे उमेदवाराला हमीपत्रही द्यावे लागते. एखाद्यावर गुन्हा असेल तर तो कोणता गुन्हा त्याचा उल्लेख हमीपत्रामध्ये असणे, आवश्यक आहे. तशी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणेही बंधनकारक आहे.
उमेदवाराला इन्कम टॅक्समध्ये रिटर्न फाईल केल्याचे कागदपत्रही सादर करावे लागतात. त्यामुळे या सर्व कागदपत्राची जमवाजमव सर्वच पक्षाच्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांकडून करण्यात येत आहे. अनेकांची हमीपत्रे तयारही झाली आहेत.
शौचालयाचा वापरकर्ता असणे बंधनकारक
उमेदवाराला निवडणुकीसाठी सादर करण्यात येणाऱ्या हमीपत्रमध्ये आपण घरगुती अथवा सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्याचा उल्लेख करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असेल तर ते नेमके सार्वजनिक शौचालय कोणते, याचा उल्लेखही करावा लागणार आहे.