Mumbai Cyber Crime pudhari photo
मुंबई

Mumbai Cyber Crime : तब्बल २,८०५ घातक एपीके फाइल तयार करणाऱ्यास जामीन

दीडशे कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणात अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : देशभरातील नागरिकांची सुमारे १५० कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांना मालवेअरयुक्त अँड्रॉइड ॲप्लिकेशन (एपीके) फाइल तयार करून पुरविल्याचा आरोप असलेल्या इंदूर येथील सॉफ्टवेअर डेव्हलपरला मुंबईतील अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने गुरूवारी जामीन मंजूर केला. पंकज अवधेशलाल गुप्ता (३६) असे आरोपीचे नाव आहे. त्याने तब्बल २,८०५ धोकादायक एपीके फाइल तयार केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने या प्रकरणाचा तपास केला. तपासात आरोपीने ज्येष्ठ नागरिक कार्ड पडताळणी, पेन्शनधारकांचे जीवन प्रमाणपत्र, वाहतूक ई-चलान, क्रेडिट कार्ड अपडेट आणि पीएम किसान योजनेच्या नावाखाली बनावट ॲप तयार केल्याचे निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.

या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना मोबाईलवर लिंक पाठवून ती डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले जात होते. संबंधित ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईलमधील गोपनीय माहिती, बँक खात्याचे तपशील आणि ओटीपी मिळवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी प्रत्येक एपीके फाइलसाठी २० ते २५ हजार रुपये घेत होता. त्याने तयार केलेल्या २,८०५ फाइल्स विविध सायबर गुन्हेगारी टोळ्यांना विकल्याचा आरोप आहे. या फाइल्सच्या माध्यमातून देशभरातील ९,६०० हून अधिक नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. सायबर फसवणुकीची रक्कम सुमारे १५० कोटी रुपये असल्याचा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.

आरोपीच्या कार्यालयातून पेनड्राइव्ह, संगणकाचा सीपीयू, तीन हार्डडिस्क, वाय-फाय राऊटर आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात देशभरातील सायबर गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग तपासला जात आहे.

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीतून दिशा

भायखळा येथील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १३ ऑगस्ट रोजी बनावट ज्येष्ठ नागरिक कार्ड पडताळणीच्या नावाखाली ५.६२ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना संशयास्पद एपीके फाइलचा माग काढण्यात यश आले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी इंदूरमधील पंकज गुप्तापर्यंत धागेदोरे जोडले आणि त्याला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT