मुंबई : एकाचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला तर दुसरा उमेदवार वेळेत अर्ज सादर करू शकला नाही. त्यामुळे मुंबईत भायखळ्यातील 211 आणि 212 या दोन वॉर्डात आता भाजपचा उमेदवार नसेल. वॉर्ड क्रमांक 212 च्या भाजपच्या अधिकृत उमेदवार मंदाकिनी खामकर निवडणूक कार्यालयात 15 मिनिटे उशिरा पोहोचल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. तर, 211 चे उमेदवार शकील अन्सारी यांचा अर्ज छाननीत बाद झाला.
भाजपने मंदाकिनी खामकर यांना वॉर्ड 212 मधून उमेदवारी दिली होती आणि पक्षाकडून वेळेत एबी फॉर्मही प्रदान करण्यात आला होता. मात्र, निवडणूक अर्जासोबत जोडावे लागणारे नवीन बँक खात्याचे काम पूर्ण करण्यासाठी त्या बँकेत गेल्या. बँकेतील तांत्रिक प्रक्रिया आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. बँकेचे काम आटोपून त्या थेट प्रभाग कार्यालयात पोहोचल्या, पण तोपर्यंत मुदत संपली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत होती. मात्र, मंदाकिनी खामकर या प्रभाग कार्यालयात 5:15 वाजता पोहोचल्या. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. या घटनेमुळे भाजपला निवडणुकीपूर्वीच एका महत्त्वाच्या जागेवर मोठा धक्का बसला आहे.
प्रभाग क्रमांक 212 मध्ये अभासेच्या गीता गवळी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, मनसेकडून श्रावणी हळदणकर आणि काँग्रेसच्या नाजिया सिद्दीकी उमेदवार आहेत. तर, प्रभाग क्रमांक 211 मधून यंदा काँग्रेसचे खान मोहम्मद वकार निसार अहमद, समाजवादी पक्षाकडून एजाज अहमद खान निवडणुकीत आहेत. तर, भाजपकडून शकील अन्सारी यांना उमेदवारी देण्यात आली होती . मात्र उमेदवारी अर्ज छाननीत शकील अन्सारी यांचा अर्ज बाद झाला आहे.
दरम्यान, वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपकडून शिल्पा केळुसकर यांना नजरचुकीने पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, तो पक्षाने परत घेतला. केळुसकर यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेले एबी फॉर्म हे मुळ प्रत नसून नकल (ड्युप्लीकेट) असून तो रद्द करण्याची मागणी मुंबई भाजपाध्यक्ष अमीत साटम यांनी पत्राद्वारे निवडणूक निर्णय अधिर्क़ायांकडे केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्राप्त 2 हजार 516 उमेदवारी अर्जांपैकी 167 उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरले तर उर्वरित 2 हजार 231 अर्ज वैध ठरले. नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर, शनिवार, 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून वैध उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून सर्व 23 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया राबविण्यात आली. उमेदवारांनी योग्य कागदपत्रे, ना-हरकत प्रमाणपत्रे, अर्जाचे सर्व रकाने नीट भरले आहेत की नाही यासह विविध बाबींची तपासणी करण्यात आली. ज्यांचे अर्ज परिपूर्ण आहेत, त्यांचे अर्ज वैध ठरवून अंतिम करण्यात आले. त्यानुसार, 2 हजार 231 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर 167 नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली.