मुंबई : चेंबूर येथील बीपीसीएल कंपनीच्या पेट्रोल डिझेलच्या पाईपलाईनला टॅपिंग करून करोडो रुपयांचे तेल चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 13 जणांच्या टोळीला आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. आरसीएफ पोलिसांची मोठी कारवाई मानली जात आहे.
पेट्रोल-डिझेल वाहून नेणाऱ्या 18 इंच व्यासाच्या पाईपलाईनला टॅपिंग करताना आगीच्या संपर्कात आली असती तर मोठा भडका उडाला असता. त्याची झळ संपूर्ण चेंबूरला बसली असती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडकरी खाण रोड पेप्सी कंपनी गेटजवळ फुटपाथवर असलेल्या गटाराच्या खालून सुमारे अडीच मीटर खोलवर 18 इंच व्यासाची मुंबई - मनमाड मल्टी प्रोडक्स तेल वाहून नेणारी पाईपलाईन गेली आहे. फुटपाथच्या बाजूला पार्किंगच्या गाड्या उभ्या असतात. पार्किंगचा आसरा घेत काही अज्ञात इसमांनी फुटपाथला तोडून गटारात प्रवेश करून अडीच मीटर खड्डा केला होता. गॅस कटरच्या सहाय्याने तेल वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला टॅप करण्याचा प्रयत्न करत होते.
ही माहिती मिळताच कंपनीचे बीपीसीएल मॅनेजर हर्षल भाजीपाले यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे यांच्या पथकाने मुख्य सूत्रधार रियाज अहमद मुल्ला (59) रा. वाशी, सलीम मोहम्मद शेख (43) रा. मुंब्रा, विनोद देवचंद पंडित (48) रा. चेंबूर यांना ताब्यात घेतले. त्यांचा या गुन्ह्यात मुख्य सहभाग असल्याचे स्पष्ट होताच त्यांना व त्यांच्या दहा साथीदारांना मुंबईच्या विविध भागांतून अटक करण्यात आली. हे सर्व सराईत गुन्हेगार असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत पेट्रोल पाईप लाईनला टॅपिंग करून तेलचोरीचे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.