मुंबई : राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते. बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षा अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 रोजी शेवटची मुदत देण्यात आली होती.
तथापि, मराठवाड्यासह नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आदी ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.