मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने कायमच महाराष्ट्राला महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यामुळेच मोदी सरकारने तिसर्या कार्यकाळाचे शंभर दिवस पूर्ण होण्याआधीच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. जवळपास 1 .20 लाख कोटींची गुंतवणूक असणार्या प्रकल्पांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील रेल्वेच्या विकासासाठी केंद्र सरकारने यावर्षी 15 हजार 940 कोटींच्या विकासनिधीला मान्यता दिली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात मिळणार्या निधीपेक्षा ही रक्कम 13 पट असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली.
‘पुढारी न्यूज’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘महासमिट 2024’ या परिसंवादात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील विकासकामांचा आढावा घेतला. महाराष्ट्रासाठी मोदी सरकारने आपल्या पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यकाळातच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यातील वाढवण बंदरासारखा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासातील मैलाचा दगड ठरणार आहे. यातून राज्यभरात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या बंदरासाठी 76 हजार 200 कोटींची गुंतवणूक होणार आहे.
यासोबतच, ठाण्यातील औद्योगिक आणि सामाजिक विकासासाठी ठाणे मेट्रोच्या रिंगरूट प्रकल्पालाही केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. 12 हजार 200 कोटींच्या या प्रकल्पातून 22 स्थानकांचा 29 किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका तयार होईल. या जोडीलाच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र रेल्वे मार्गाने जोडणे आवश्यक आहे. त्यासाठीच 7 हजार 106 कोटींच्या जळगाव-जालना रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. तर पुणे मेट्रोच्या स्वारगेट-कात्रज विस्तारीकरणासाठी 2 हजार 900 कोटींचा प्रकल्प, ठाणे- बोरिवली या 11.8 किलोमीटरच्या भुयारी मार्गासाठी 16 हजार 100 कोटींचा प्रकल्प तसेच दिघी पोर्ट औद्योगिक कॉरिडोरलाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्रात सुमारे 1 लाख 20 हजार कोटींच्या कामांना या काळात सरकारने मान्यता दिली आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
महाराष्ट्रातील रेल्वे कामांच्या विकासासाठी काँग्रेस सरकारच्या काळात दरवर्षी फक्त 1 हजार 171 कोटीच मिळत असत. मोदी सरकारच्या काळात यात तब्बल 13 पट वाढ झाली आहे. यंदा म्हणजेच 2024-25 या वर्षातील महाराष्ट्रातील रेल्वे कामांसाठी 15 हजार 940 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. यातून महाराष्ट्रातील रेल्वेचा कायापालट होणार असल्याचे मंत्री वैष्णव यांनी सांगितले. महाराष्ट्रात सध्या 5 हजार 877 किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकचे काम सुरू आहे. 41 प्रकल्पातून सुमारे 81 हजार 580 कोटी इतक्या गुंतवणुकीची कामे सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत. यात 132 रेल्वेस्थानकांचा पुनर्विकासासाठी 6 हजार 411 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकांच्या विकासासोबतच 318 रेल्वे क्रॉसिंगवरील फाटकांसाठी 5 हजार 615 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे 1 लाख 39 हजार 463 कोटींची कामे सुरू असल्याचे मंत्री वैष्णव यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात दै.‘पुढारी’चे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. स्वातंत्र्यानंतरही दै. ‘पुढारी’ सियाचीनसारख्या भागात श्रद्धेने रुग्णालय चालविण्याचे काम अव्याहतपणे करत आहे. ‘पुढारी’ने सातत्याने समाजाला जोडण्याचे काम केले आहे. सध्याच्या काळात माहितीचा महापूर आला आहे. माहितीच्या या भडीमारात कोणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. माहितीच्या या महापुरात दै. ‘पुढारी’ने आवाज हा आश्वासक आणि विश्वासार्ह राहिला आहे. राष्ट्रनिर्माणात दै. ‘पुढारी’ची विश्वासार्ह पत्रकारिता आवश्यक असल्याचेही मंत्री वैष्णव यांनी अधोरेखित केले.