पवन होन्याळकर
मुंबई: दहावीची पायरी ओलांडताच राज्यातील साडेपंधरा लाख विद्यार्थ्यांच्या करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. कुणी अकरावीची वाट धरली, कुणी पॉलिटेक्निक निवडले, तर कुणी आयटीआयची.
अकरावीला सर्वाधिक आतापर्यंत १३ लाख ४३ हजार ४१८ प्रवेश झाले असले, तरी जागा भरण्याच्या प्रमाणात पॉलिटेक्निक आणि आयटीआय पुढे आहेत. त्यामुळे दहावीनंतरच्या शिक्षणाच्या पारंपरिक वाटेसोबतच तंत्रशिक्षणात वाढ झाल्याचे प्रवेश प्रक्रियेत दिसून आले.
दहावीचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी गेल्या तीन महिन्या प्रवेशाची धावपळ राज्यात मोठ्या प्रमाणात सुरु होती ‘कनिष्ठ महाविद्यालय की कौशल्याचे शिक्षण?’ या प्रश्नाचे उत्तर राज्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या आकडेवारीतून दिले आहे. अकरावीच्या वर्गात सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असला, तरी उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेशाचे प्रमाण केवळ ६०.२६ टक्के आहे.
दुसरीकडे आयटीआयमध्ये ८१ टक्के, तर पॉलिटेक्निकमध्ये तब्बल ८२.३३ टक्के जागा भरल्या आहेत. त्यामुळे दहावीनंतर पारंपरिक अकरावीबरोबरच तांत्रिक आणि कौशल्याधारित शिक्षणालाही विद्यार्थ्यांकडून मोठी पसंती मिळत असल्याचे यंदाच्या प्रवेशाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
राज्यात यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या १४ लाख २० हजार ४८६ नियमित विद्यार्थ्यांसह रिपीटर आणि इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांची संख्या १५ लाखांहून अधिक होती. यापैकी तांत्रिक शिक्षणाच्या प्रवाहात पॉलिटेक्निकने यंदा लक्ष वेधून घेतले आहे. राज्यातील ४४९ तंत्रनिकेतन संस्थांमध्ये १ लाख ३९ हजार १४७ जागा उपलब्ध होत्या.
या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील १ लाख ४० हजार ३६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. अंतिम गुणवत्ता यादीत १ लाख ४१ हजार ५ मध्ये ९३ हजार ५४२ मुले आणि ४७ हजार ३९७ मुली होत्या. यापैकी १ लाख १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यात ७६ हजार २६६ मुले आणि ३८ हजार ३०७ मुली आहेत.
उपलब्ध जागांच्या तुलनेत पॉलिटेक्निकमधील प्रवेशाचे प्रमाण ८२.३३ टक्के आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या तीन शाखांमध्ये तब्बल ५७ हजार १५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या तीन शाखांच्या प्रवेशात ४ हजार ९४० विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. पॉलिटेक्निकपाठोपाठ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडेही विद्यार्थ्यांचा चांगला ओघ राहिला आहे. राज्यात १,००४ आयटीआय संस्थांमध्ये १ लाख ४९ हजार ५२३ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी २ लाख ३६ हजार ८२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
त्यापैकी २ लाख ६ हजार ५०९ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण केले, तर २ लाख २ हजार ४३७ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले. पर्याय अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५२ हजार ३१३ होती. शनिवारपर्यंत १ लाख २२ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेशाचे प्रमाण ८२ टक्के प्रवेश झाले आहे.
विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक डिझेल, फिटर, वेल्डर, वायरमन आदी ट्रेडला विशेष पसंती दिली आहे. रोजगाराभिमुख कौशल्य मिळवून लवकर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे प्रवेशाच्या आकडेवारीतून दिसते. मात्र खासगी आयटीआयच्या जागा जास्त रिकाम्या राहिल्या आहेत.
राज्यातील ९ हजार ६९८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २२ लाख २९ हजार ५१८ जागा उपलब्ध आहेत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाख ५२ हजार ६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १३ लाख ४३ हजार ४१८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
उपलब्ध जागांच्या तुलनेत अकरावीतील प्रवेशाचे प्रमाण ६०.२६ टक्के आहे. अजून एक शेवटची फेरी होत आहे. आणखी काही प्रवेश वाढतील, अशी शक्यता आहे. आकडेवारीनुसार ६ लाख ५९ हजार ९५७ मुले, ६ लाख ३८ हजार ४८१ मुली आणि २४ इतर विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत.