मुंबई: आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविणारी ‘108’ रुग्णवाहिका सेवा आता हजारो गर्भवती महिलांसाठी चालते-बोलते प्रसूतिगृह ठरत आहे. राज्यभरात 15 मे पर्यंत तब्बल 41 हजार 786 महिलांची प्रसूती थेट रुग्णवाहिकेतच झाली आहे.
वेळेवर रुग्णालयात पोहोचता न आल्याने, दुर्गम भागातील वाहतूक आणि आरोग्य सुविधांतील मर्यादा तसेच अचानक सुरू झालेल्या प्रसूती वेदनांमुळे अनेक महिलांची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. पण आदिवासी दुर्गम भागापेक्षा पुण्यात सर्वाधिक प्रसूती रुग्णवाहिकेत झाल्या आहेत.
महाराष्ट्रात ‘108’ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा 26 जानेवारी 2014 रोजी सुरू करण्यात आली. ही सेवा राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) सुरू करण्यात आली असून अपघात, हृदयविकार, प्रसूती, आपत्कालीन वैद्यकीय मदत आणि गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे.
विशेष म्हणजे, राज्यात 26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या ‘108’ रुग्णवाहिका सेवेमुळे गेल्या बारा वर्षांत लाखो रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळाली असून, 41 हजारांहून अधिक बाळांनी रुग्णवाहिकेतच नवजीवनाचा पहिला श्वास घेतला आहे.
या सर्व प्रसंगांमध्ये ‘108’ रुग्णवाहिका सेवेतील प्रशिक्षित वैद्यकीय तंत्रज्ञ, चालक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रसूती सुरक्षितपणे पार पाडत आई आणि नवजात बालकाचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक वेळा प्रतिकूल परिस्थितीत आणि मर्यादित साधनसामग्रीत या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे हजारो मातांना वेळेवर मदत मिळाली आहे.
राज्यातील जिल्हानिहाय आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 3861 प्रसूती रुग्णवाहिकेत झाल्या आहेत. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये 3310, सोलापूरमध्ये 2405 आणि सातारा जिल्ह्यात 2159 प्रसूतींची नोंद झाली आहे.
अहिल्यानगरमध्ये 1949, धुळ्यात 1829, कोल्हापुरात 1724 आणि औरंगाबादमध्ये 1689 महिलांनी रुग्णवाहिकेत बाळाला जन्म दिला. मुंबईसारख्या महानगरातही 830 प्रसूती रुग्णवाहिकेत झाल्याची नोंद आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी 247 प्रसूती रुग्णवाहिकेत झाल्या आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ग्रामीण आणि आदिवासी भागात अनेक ठिकाणी प्रसूतीपूर्व वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि तातडीच्या आरोग्यसेवा अद्यापही अपुऱ्या असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. मात्र दुसरीकडे, ‘108’ रुग्णवाहिका सेवेने राज्यातील हजारो महिलांना योग्य वेळी मदत उपलब्ध करून सुरक्षित मातृत्वाचा आधार दिला आहे.
त्यामुळे ही सेवा केवळ आपत्कालीन वाहतूक व्यवस्था न राहता मातृ आणि बाल आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा बनली आहे. अनेक कुटुंबांसाठी रुग्णवाहिकेतील काही मिनिटांचा प्रवास हा आयुष्यभराची आठवण ठरला आहे.