मराठवाडा

बीड : धाकट्या पंढरीत आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मांदियाळी

Shambhuraj Pachindre

गेवराई पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायण गड येथे आषाढी एकादशी निमित्त रविवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पंचक्रोशीतील विविध गावांमधून वारकरी भाविक आषाढी वारी निमित्त विठुनामाचा जयघोष करत टाळ- मृदुंगाच्या गजरात दिंडीच्या माध्यमातून पायी चालत गडावर दाखल झाले होते. जिल्ह्यासह विविध भागातून श्री क्षेत्र नारायणगड येथे भाविकांची मांदियाळी होती. यावेळी गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते पहाटे महापूजेसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दरम्यान विठूरायाच्या नामस्मरणाने व नगदनारायण महाराजांच्या जयघोषाने गडाचा परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.

मराठवाडा ही साधू संतांची भूमी आहे याच मराठवाड्यामध्ये अनेक साधू संत जन्माला आले. भागवत धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भगवंत सेवेसाठी समर्पित केलेले आहे. याच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सोळाव्या शतकात स्वानंद सुखनिवासी सचिदानंद स्वरूप संत महात्मा नारायण महाराज यांनी स्थापन केलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडानी महाराष्ट्राची धाकटी पंढरी अशी आपली ओळख निर्माण झाली आहे. आषाढीवारी निमित्त जे भाविक भक्त श्री क्षेत्र पंढरपूर ला जाऊ शकत नाहीत ते धाकटी पंढरी म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगड येथे येऊन विठ्ठल रुक्मिणी व नगदनारायण महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतात.

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र नारायण गड येथे नित्यनियमाप्रमाणे पहाटे संस्थनाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते विठ्ठलाची व नगद नारायण महाराज यांची महापूजा करण्यात आली. तसेच मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच आलेल्या भाविकांना संस्थानच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थानचे स्वयंसेवक तसेच बीड पोलिस स्टेशन, शिरूर पोलिस स्टेशन यांच्या वतिने पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. शिरुर व बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस तसेच होमगार्ड मंदिर परिसरात विविध ठिकाणी बंदोबस्तात तळ ठोकून होते.

श्रीक्षेत्र नारायणगड हे भाविकांचे श्रद्धास्थान असून, जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भाविक याठिकाणी येतात.आषाढीवारी निमित्त लाखो भाविकांची गर्दी असते. जिल्ह्यासह जालना,औरंगाबाद ,पैठण सह विविध भागातून वारकऱ्यांसह भाविक न चुकता गडावर दर्शनासाठी हजेरी लावतात. नगदनारायण महाराजांवर भाविकांची खूप मोठी श्रद्धा येथे आहे. तसेच एकादशी निमित्त नित्यनेमा प्रमाणे विठ्ठलाची तसेच नगदनारायण महाराजांची महापुजा झाली यानंतर भजन, किर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. तर उपस्थित भाविकांना महाप्रसादरुपी फराळाचे देखील संस्थानच्या वतीने वाटप करण्यात आले आहे.

– महंत श्री.ह.भ.प.शिवाजी महाराज ( मठाधिपती,श्रीक्षेत्र नारायणगड संस्थान)

आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. परंतू गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे आषाढी वारीला येता आले नाही.परंतु यंदा आषाढी एकादशीला वारी निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणगड येथे विठूरायाच्या व नगदनारायण महाराजांच्या दर्शनासाठी आलो. दर्शन घेतल्‍याने मनाला समाधान वाटले.
– भिवराज मुळक, वारकरी गेवराई

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT