केज; पुढारी वृत्तसेवा : तुम्ही दारू पिऊन आईला त्रास का देता ? असा जाब विचारत मुलाने वडिलांना दारू पाजून त्यांच्यावर कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह सोयाबीनच्या भुसकटात झाकून ठेवला. ही खळबळजनक घटना केज तालुक्यातील साळेगाव येथील पारखे नावाच्या माळावर मंगळवारी (दि.१४) दुपारी घडली. आरोपी मुलगा स्वतःच पोलीस ठाण्यात हजर होऊन त्याने खुनाची माहिती पोलिसांना दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, केज तालुक्यातील जवळबन येथील पवन शिवाजी हंकारे वय (वय २६) याने त्याचे वडील शिवाजी केशव हंकारे (वय ५५ ) यास जवळबन येथून मोटार सायकलवर बसवून साळेगाव येथील गावाच्या दक्षिण दिशेला असलेल्या निर्मनुष्य पारखेचा माळ येथे घेऊन गेला. त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू पिले. त्यानंतर पवन हंकारे हा त्याचे वडील शिवाजी हंकारे यास म्हणाला की, तुम्ही दारू पिऊन आईला त्रास का देता ? असा जाब विचारला.
त्यानंतर दोघांत बाचाबाची झाली. पवन हंकारे याने दारूच्या नशेत असलेल्या वडील शिवाजी हंकारे यास अगोदर हाताने मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने हातावर व पायावर सपासप वार केले. शिवाजी हंकारे हा दारूच्या नशेत असल्याने तो प्रतिकार करू शकला नाही. त्या नंतर पवन हंकारे याने शिवाजी हंकारे याच्या मानेवर आणि तोंडावर कोयत्याने सपासप एकून ९ ते १० वार केले. त्यामुळे अतिरक्तस्रावाने शिवाजी हंकारे याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पवन हंकारे याने शिवाजी हंकारे याचा मृतदेह सोयाबीनच्या भुसकटात झाकून खून लपविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पवन हंकारे याने बुधवारी दुपारी स्वतः युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हजर होऊन वडिलांचा खून करून प्रेत केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळेगाव शिवारात लपवून ठेवले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांना दिली. सुरुवातीला डॉ. दहीफळे यांना हा युवक वेडसर किंवा नशेच्या अंमलाखाली असेल अशी शंका आली. परंतु, त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी आरोपी पवन हंकारे यास सोबत घेऊन घटनास्थळी गेले.
त्यानंतर तत्काळ सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे घटनास्थळी हजर झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठविण्यात आला.
आरोपी पवन हंकारे याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दि. २१ जूनपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे करीत आहेत.