मराठवाडा

नांदेड : रेती तस्करीत ‘व्हॉईट कॉलर; माजी नगरसेवकावर गुन्हा

Shambhuraj Pachindre

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील रेतीच्या अर्थकारणाने भल्याभल्यांना भुरळ घातली आहे. यामधून राजकीय नेत्यांसह प्रशासनातील अधिकारीही सुटले नाहीत, मात्र 'कॉमन मॅन' रेतीच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे त्रस्त आहे. आता रेती तस्करी मुळापासून उखडून फेकण्याचा विडा पोलिसांनी उचलला आहे. सोमवारी झालेल्या कारवाईत एका माजी नगरसेवकाविरुद्धही गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी 'व्हॉईट कॉलर'वर हात घातला असल्याने 'खाकी' आक्रमक झाल्याचे दिसते.

रेतीच्या अवैध धंद्यामध्ये महसूलचे अधिकारी, पोलिस आणि तस्करांचे अपवित्र संबंध आता लपून राहिलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी एका मागोमाग एक दोन लाचखोरीच्या घटना घडल्या. या दोन्ही घटनांमध्ये दोन पोलिस कर्मचारी अडकले. या प्रकाराने 'खाकी'ची इभ्रत वेशिला टांगली गेली. या प्रकारानंतर पोलिस आक्रमक होतील आणि रेती तस्करांच्या मुसक्या आवळतील असे अपेक्षित होते. मात्र, झाले उलटेच. 'कोणी निंदा, कोणी वंदा' 'वसुली हाच आमचा एकमेव धंदा' या म्हणी प्रमाणे पुर्वी सारखेच सर्व सुरळीत सुरू आहे. मात्र 'खाकी'वर लागलेला डाग पुसण्यासाठी ग्रामीणचे ठाणेदार अशोक घोरबांड सक्रिय झाले आहेत.

सोमवारी रात्री घोरबांड यांनी गंगाबेट घाटावर जाऊन दोन तस्करांच्या मुसक्या आवळल्याच नाही, तर त्यांच्याविरुद्ध गंभीर कलमे लावून गुन्हा दाखल केल्याने त्यांचा पोलिस कोठडीनंतर तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे. लोह्याचे माजी नगरसेवक रमेश माळी यांच्यावरही या प्रकरणात गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यांच्या मालकीचा रेती भरलेला हायवा पोलिसांनी जप्त केला आहे. माळी राजकारणात सक्रिय होते. 2009 साली ते शिवसेनेच्या तिकिटावरून लोह्यातून नगरसेवक झाले. पुढे त्यांनी चिखलीकर मित्रमंडळात बस्तान मांडले. तिथेही खटकल्याने त्यांनी शिवा संघटनेचा रस्ता धरला.

2018 झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविली. या निवडणुकीत नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला गेला. मात्र रमेश माळी यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राजकारणाला सोडचिठ्ठी देत त्यांनी रेतीच्य व्यवसायात जम बसविला. रेती तस्करी व तस्कर मुळापासून उद्ध्वस्त करायचे असेल, तर पोलिसांना जिल्हास्तरावर मोठी मोहीम हाती घ्यावी लागेल. एकट्या घोरबांड पाटलांवर जवाबदारी टाकून चालणार नाही. जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांनी या मोहिमेत सहभाग घ्यायला हवा आणि जिल्हाभर कार्यक्षेत्र असलेल्या 'क्राईम ब्रँच'लाही मैदानात उतरावे लागेल. या शिवाय हा गोरखधंदा थांबणार नाही.

या गोरखधंद्यामध्ये कमी कष्टात अधिक पैसे मिळत असल्याने संघटित गुन्हेगारी टोळ्या कार्यरत होऊन त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. या संघटीत गुन्ह्यात तस्करांचा सहभाग आणि त्यांचे रेकॉर्ड तपासून त्यांच्याविरुद्ध एनपीडीए आणि मोका कायद्यांतर्गत कारवाई करावी लागणार आहे. तसेच तस्करी करणार्‍या वाहनांची नोंदणी रद्द करण्यासाठीचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविल्यास रेती तस्करीला आळा बसू शकतो. या तस्करीतून रेती तस्करांनी मोठी अवैध माया जमवली असून काही काळातच त्यांच्याकडे महागड्या अलिशान गाड्या आल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी मालमत्ताही खरेदी केली आहे. या सर्व प्रकाराची प्रामाणिकपणे चौकशी झाल्यास रेती तस्करी थांबविणे शक्य आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT