'Yoga will be included in the Asian Olympics'
'आशियाई ऑलिम्पिक मध्ये योगाचा समावेश होणार' Pudhari Photo
मराठवाडा

आशियाई ऑलिम्पिक मध्ये योगाचा समावेश होणार, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा

प्राचीन योगकलेला आशियाई खेळांमध्ये सहभागी करून घेण्यास आशियाई ऑलिंपिक परिषदेने संमती दर्शवल्यामुळे येणाऱ्या ऑलिंपिक खेळामध्ये योगा संदर्भातील प्रात्यक्षिक खेळ दिसणार आहेत. ही भारतीयांसाठी गौरवाची बाब असणार आहे अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारतामध्ये योगाभ्यास केला जात आहे. योगामुळे मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. या योगाचा अभ्यास भारतासह पाश्चिमात्य देशांमध्येही मोठ्या प्रमाणात केला जात आहे, त्यापासून होणारे लाभही दिसू लागल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा व्हावा असे मत मांडले होते. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने पाठिंबा दिला.

2014 पासून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती पीटी उषा यांनी नुकतीच केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रतापराव जाधव यांनी आशियाई खेळांमध्ये योगाचा समावेश झाला पाहिजे याबाबत अनुकुलता दर्शविली होती. त्या विषयीचा प्रस्ताव आशियाई ऑलिंपिक परिषदेच्या कार्यकारी मंडळाकडे पाठविण्यात आला. तसेच आशियाई आलिम्पिक परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष रणधीर सिंग यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा केला. मंडळाने आशियाई खेळामध्ये योगाचा सहभाग करण्यासंदर्भात सहमती दिली आहे.

आशियाई ऑलिंम्‍पिक परिषदेची आमसभा सप्टेंबर महिन्यात होणार असून या सभेमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर आशियाई ऑलिंम्‍पिक स्पर्धेमध्ये औपचारिक रूपाने योगाला स्थान मिळणार आहे. भारतीय प्राचीन योगकलेचा आशियाई ऑलिम्‍पिक स्पर्धेमध्ये समावेश होणे हा १४० कोटी भारतीयांचा गौरव असेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

SCROLL FOR NEXT