मराठवाडा

वाशिम: हळदीचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

अविनाश सुतार

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हळद उत्पादक शेतकरी अडचणीत असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या हळदीला अत्यल्प दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन केले. शेजारील हिंगोली जिल्ह्यात हळदीला ७३०० रुपये दर असताना वाशिममध्ये केवळ ५७०० रुपये दर का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित करून सरकारचा निषेध व्यक्त केला.

एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव जाहीर करते, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भावाने मालाची विक्री करावी लागत आहे. हळदीला चांगले दर मिळतील, या आशेने वाशिम बाजार समितीमध्ये केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर हिंगोली जिल्ह्यातून जवळपास तीन ते साडेतीन हजार क्विंटल हळद विक्रीस आलेली होती. मात्र, हळदीला केवळ ५ हजार ७०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती.

पोलीस प्रशासन व बाजार समितीच्या वतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीला ७३०० रुपये दर, रिसोड व इतर बाजार समित्यांमध्ये चांगले दर असताना वाशिम बाजार समितीमध्ये दर कमी का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यामुळे लिलाव प्रक्रिया बंद करण्यात आली. सकाळपासूनच शेतकरी उपाशी पोटी आपला माल घेऊन बाजार समित्यांमध्ये आले होते. बाजार समित्यांमध्ये मात्र शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

शेतकऱ्याला सापत्न वागणूक का ?

येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची हळद उघड्यावर तर व्यापाऱ्यांची ओट्यावर होती. उघड्यावर हळद असल्याने उन्हामुळे हळदीला अत्यल्प दर मिळतो. त्यामुळे व्यापाऱ्यांचा ओट्यावर असलेला माल खाली करावा व शेतकऱ्यांचा माल ओट्यावर ठेवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT