मराठवाडा

तुळजापूर: दिवाळी सुट्ट्यानिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर

अविनाश सुतार

तुळजापूर: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मागील चार दिवसापासून तुळजाभवानी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी होत आहे. दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर होणारी भाविकांची गर्दी प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरली आहे. शुक्रवारपासून (दि.२५) मंदिर परिसरामध्ये भाविकांची तुडूंब गर्दी होऊ लागली आहे. परिणामी मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर मोठी चढाओढ होत आहे. आतमध्ये प्रवेश करताना भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पर्यायी निंबाळकर दरवाजासमोरही मोठ्या संख्येने भाविकांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.

नवरात्र उत्सवात येता न आलेले भाविक दिवाळीच्या सुट्टीत दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे गर्दी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रत्येक दिवाळी सुट्टीच्या काळात अशी गर्दी होत आहे. देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक आणि कुलधर्म कुलाचार करण्यासाठी येणारे भाविक यांची मोठी संख्या आहे. तुळजाभवानी देवीला वेगवेगळे धार्मिक कुलधर्म कुलाचार केले जातात. मध्यरात्रीपासून भाविक भक्त अभिषेक करण्यासाठी रांगेमध्ये उभे असतात. रात्री बारा वाजता रांगेमध्ये थांबलेल्या भाविकांना मध्यरात्री एक वाजता मंदिर उघडल्यानंतर अभिषेकाचा पास दिला जातो. त्यानंतर पहाटे अभिषेक सुरू होतात.

मंदिरामध्ये जाण्यासाठी अरुंद मार्ग असल्यामुळे व मंदिर परिसर सखल असल्यामुळे एकाच वेळी गर्दी झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण होते. मागील शुक्रवारी लाखो भाविक एकाच वेळी दर्शनासाठी तुळजापुरात आल्याने मंदिर परिसर कमी पडला. भाविकांची रेटारेटी पाहावयास मिळाली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. भाविकांना सुरळीत दर्शन घेता आले.

गर्दीच्या काळात भाविकांना दर्शनासाठी किमान तीन ते चार तास वेळ लागतो. अशा प्रसंगांमध्ये दर्शन मंडपामध्ये असणारे चारही मजले भाविकांनी भरून जातात. या प्रसंगांमध्ये जलद गतीने दर्शन देऊन भाविकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो. दरम्यान, गर्दीच्या काळात मंदिरामध्ये मुबलक पाणी उपलब्ध नसल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. दर्शन करताना आम्हाला तत्काळ दूर केले जाते. त्यामुळे दर्शनाचे समाधान मिळत नाही, अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT