जिंतूर : पुढारी वृत्तसेवा
रिपब्लिकन सेनेचे शरद चव्हाण यांनी अवैधरित्या वाळूच्या लुटमारी विरोधात नुकतेच तहसील कार्यालयासमाेर बेमुदत उपोषण सुरू करून आंदोलन छेडले होते. आता स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाने आधीच्या काही तक्रारींचा आधार घेऊन धडक कारवाई सुरु केली. यामध्ये सावळी येथे छापे टाकून बेकायदा वाळू उपशासाठी वापरात असलेल्या साधनसामग्री जप्त करण्यात आल्या आहेत.
मंडळ अधिकारी गजानन प्रभाकर कन्व यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोकलँड, बोटसहित सर्व साधनसामुग्री जप्त करत तहसील कार्यालयात जमा केली. जमीन महसूल संहिता कलम शासनाच्या 48 (7),(8) गुन्हा दाखल केला आहे. या धडक कार्यवाहीच्या पथकात उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार सखाराम मांडवगडे, पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, मंडळअधिकारी गजानन कन्व,मंडळ अधिकारी प्रशांत राखे (सेलू)तलाठी अनिल राठोड,पोलीस कंठाळे आदींचा समावेश होता.
दरम्यान, तालुक्यातुन लोणार, वझर मार्गे पूर्णा नदीचा प्रवाह जातो. जिथे वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात चालते. सर्व नियम पायदळी तुडवत वाळू माफियांच्या टोळ्या बेसुमार वाळू उपसा करून आपले उखळ पांढरे करत होते. महसूल प्रशासनाने वाळू माफिया विरोधात कार्यवाही साठी असेच सात्यात ठेवावी अशी मागणी आता जोर धरत आहे.