हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी शिवारात कालव्याच्या पुलावर दुचाकी उभी करून मावशीच्या समोरच कालव्यात सुरज माने (वय 25, रा. कान्हेगाव) याने उडी घेतली होती. त्याचा मृतदेह तब्बल 12 तासानंतर मंगळवारी (दि.२७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दाती शिवारात आढळून आला. घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलीस दाखल झाले आहेत.
सुरज माने हा सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कान्हेगाव (ता.कळमनुरी) येथून दुचाकीवर त्याच्या मावशीला आखाडा बाळापूर येथे सोडण्यासाठी निघाला होता. त्यानंतर पिंपरी शिवारात कालव्याच्या पुलावर दुचाकी थांबवून मावशीच्या समोरच कालव्याच्या पाण्यात उडी घेतली होती. यावेळी त्याच्या मावशीने आरडा ओरड केल्याने कान्हेगाव परिसरातील गावकरी घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत सुरज पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला.
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार नागोराव बाभळे, विट्ठल जाधव यांच्यासह गावकर्यांनी बेपत्ता सुरजचा कालव्यात शोध सुरु केला होता. मात्र, कालव्याला पाणी असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येऊ लागल्या होत्या. या परिस्थितीतही काही तरुणांनी कालव्याच्या पाण्यात जाऊन शोध घेतला. मात्र, त्याचा शोध लागला नाही. त्यामुळे सोमवारी रात्री शोध मोहीम थांबविण्यात आली होती. दरम्यान, आज सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा शोध मोहीम सुरु केली होती. दरम्यान, सकाळी नऊ वाजता सुरजचा मृतदेह दाती शिवारात कालव्याच्या पाण्यात आढळून आला. अधिक तपास आखाडा बाळापूर पोलीस करत आहेत.