जवळाबाजार : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी संघातून ११ संचालकांसाठी ७०९ मतदार, ग्रामपंचायत संघातून ४ संचालक ७०४ मतदार, व्यापारी संघातून २ संचालक ५१८ मतदार, हमाली मापाडी संघातून १ संचालक ३२३ मतदार एकूण १८ संचालक निवडीसाठी एकूण २२५४ मतदार मतदान करणार आहेत.
राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक प्रक्रियेला आजपासून सुरूवात होणार आहे. मागील बऱ्याच कालावधी पासून निवडणुकीसाठी विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीची प्रक्रिया आज पासून सुरू झाली. हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार येथील सर्वात मोठी आडत बाजारपेठ आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा अंतर्गत हट्टा व शिरडशहापूर येथील उपबाजार पेठ चालते. येथील बाजारपेठ संलग्न गावे आहेत.
जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १८ सदस्य आहेत. यामध्ये सोसायटीतील ११ सदस्य, ग्रामपंचायत ४ सदस्य, व्यापारी २ सदस्य तर हमाल १ सदस्य उमेदवार निवडणुकीत आहेत. २७ मार्च निवडणूक कार्यक्रम जाहीर, २७ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान नामनिर्देशन दाखल करणे, दिनांक ५ छाननी, दिनांक ६ ते २० एप्रिल उमेदवारी मागे घेणे, २१ निवडणूक चिन्ह वाटप, तर दिनांक २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
जवळाबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागच्या निवडणुकीत शिवसेनेतील माजी सहकार मंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी पॅनल होते. यामध्ये शिवसेनेचा विजयी झाला होता. सध्याची परिस्थिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सरळ लढत होणार की नाही हे जागा वाटपानंतर कळणार आहे. यावेळेस सभापती शिवसेनेकडून भाजपमध्ये गेलेले आहेत, तर मुनीर पाटील काँग्रेस पक्षात गेलेले आहेत. यामुळे आगामी जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेना आणि मित्र पक्ष जागा वाटप समीकरण सुरळीत जमले तर भाजप पक्षाबरोबर सरळ लढत होईल.
कारण जवळाबाजार येथील कोणत्याही निवडणुकीत केंद्रात व राज्यात आघाडी व युती समीकरण चालते. त्या प्रमाणे येथील निवडणुकीत समीकरण चालत नाही. येथील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कोणाबरोबर निवडणुकीत आघाडी करायाची याचे नियोजन स्थानिक पातळीवरील भविष्यातील निवडणुकीत कोण कोणास कोणत्या निवडणुकीत सहकार्य करायचे या समीकरणावरून निवडणुकीत नियोजन करण्यात येत असते. या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणुकीत आघाडी व युती आणि उमेदवारी मिळाली नाही तर निवडणुकीत कोणास साथ देणार हे शेवटपर्यंत आलबेल असल्याचे पहावयास मिळत आहे.
एकंदरीत जवळाबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणुकीत या वेळेस युवा नेतृत्व व नवीन चेहर्यांना निवडणुकीतल उमेदवारी महत्वाची ठरणार आहे. कारण युवा नेतृत्व परिसरात राजकारणात सक्रिय झाली असून, आगामी काळात जिल्ह्यातील मिनी विधानसभा म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत मोठ्याप्रमाणात इच्छुक आहेत. सध्या परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीवर भविष्यातील राजकीय समीकरणे महत्वाची ठरणार आहेत. सध्या सर्वच राजकीय पक्षातील मंडळींकडून प्रचारासाठी हालचालींना सुरुवात झाली आहे. गावोगावी मतदार गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचा :