मराठवाडा

बीड: केज येथे भरधाव टँकरची ५ वाहनांना धडक; दोघे जखमी

दिनेश चोरगे

केज; पुढारी वृत्तसेवा : केज येथील बीड – केज रोडवर एक टँकर भरधाव जात असताना रस्त्यावर अचानक युटर्न घेणारे पिक-अप आडवे आल्याने त्याला वाचविण्याच्या नादात टँकरवरील ताबा सुटला. व हा टँकर पाच वाहनांना धडकला. या विचित्र अपघातात टँकरसह पाचही वाहनांचे नुकसान झाले. तर अन्य दुसऱ्या अपघातात एक मालवाहू ट्रक तहसीलच्या संरक्षक भिंतीला धडकला.

याबाबतची माहिती अशी की, आज (दि. ३०) सायंकाळी ५ च्या सुमारास गुजरातहून साबण तयार करण्यासाठी लागणारे ग्लिसरीन केरळ,  पॉंडेचरीकडे टँकर (जी जे-४४/ ए यु-७७४२) घेऊन जात होते. यावेळी हा भरधाव टँकर केज येथील बीड – केज रोडवरील हॉटेल अनिल भोजनालयासमोर आला असता कृषी कार्यालयाकडून एक पाण्याच्या जारची वाहतूक करणारे पिक-अप (एम एच-४४/७७४२) युटर्न घेत असताना अचानक आडवे आले. त्याला वाचविण्याच्या नादात टँकर त्या पिक-अपला धडकून जवळच उभ्या असलेल्या एका स्विफ्ट कार , स्कॉर्पिओ, मोटरसायकलला धडक देत डॉ. चाटे यांच्या दवाखान्यासमोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला धडकले. यात पिकअप, स्विफ्ट, मोटारसायकल, स्कॉर्पिओ, रुग्णवाहिका व टँकरसह एकून सहा वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात पिक-अप चालकासह त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती किरकोळ जखमी झाली. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान दुपारी १२:०० वा च्या सुमारास केज तहसील कार्यालयासमोर एका मालवाही ट्रक (केए-५६/२१८६) चालकाने एका चारचाकी गाडीला वाचविताना मालवाहू ट्रक तहसील कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर घातला. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

केजच्या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली असली तरी वाहनचालक त्यांची वाहने रस्त्यावर उभी करीत आहेत. तसेच अनेक वाहनधारक हे बेशिस्तपणे वाहन चालवत वेग मर्यादेचे उल्लंघन करीत आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.

           हेही वाचा ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT