मराठवाडा

माहूर गडावर शारदीय नवरात्रौत्सव आढावा बैठक संपन्न

अमृता चौगुले

श्रीक्ष्रेत्र माहूर; पुढारी वृत्तसेवा : साडेतीन शक्तिपिठापैकी मूळपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री रेणुका गडावर आश्विन शूध्द प्रतिपदा ते विजया दशमी म्हणजेच दि.२६ सप्टें. ते 5 आक्टों. पर्यंत संपन्न होणार्‍या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नियोजनाबाबतची आढावा बैठक संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांचे अध्यक्षतेत व निवासी जिल्हाधिकारी प्रदीप कुळकर्णी, पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तिकीरण पूजार, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे , कोषाध्यक्ष तथा तहसिलदार किशोर यादव, न.पं.चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लाड,मुख्याधिकारी राजकुमार राठोड, संस्थानचे विश्वस्त यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाचा आढावा सादर केला.

या बैठकीत न. पं. चे मुख्याधिकारी यांनी वाहनतळ, पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, आस्थाई मुतारी, स्वच्छता आदी बाबीची पूर्तता करणार असल्याची ग्वाही दिली. आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड यांनी विविध आगारातून ८० व माहूर आगाराच्या २० अशा एकूण १०० बसेस सेवा देणार असल्याचे सांगितले. विद्युत वितरण कंपनीचे एन. पी.कोठे यांनी गुंज आणि किनवट येथून विद्युत पुरवठा खंडित न झाल्यास अविरतपणे विद्युत पुरवठा करणार अशी वास्तव स्थिती मांडली. पो.नि.नामदेव रिठ्ठे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवणार असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता वसंत झरिकर यांनी आमच्या अधिपत्याखाली येणाऱ्या रस्त्याची डागडुजी करणार असल्याचे सांगितले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पवार यांनी औषधी साठ्यासह ३ रुग्णवाहिका व कर्मचाऱ्यासह जागोजाग पथक तैनात करणार असल्याचे मान्य केले.ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.झिने यांनी तीन वैद्यकीय पथके व रुग्णवाहिका सुसज्ज ठेवणार असे सांगितले. अन्न व औषधी प्रशासन, वन विभाग, पुरातत्व विभाग, बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी इत्यादींनी आढावा बैठकीकडे पाठ फिरवली.

सदर बैठकीत पत्रकार विजय आमले, वसंत कपाटे व सरफराज दोसाणी यांनी व्यवस्थेविषयीच्या काही अपेक्षा व्यक्त केल्या. अध्यक्षीय समारोपातून जिल्हा न्यायाधीशांनी सर्वांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही दिली. सूत्र संचलन न. पं. चे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी केले, तर विस्वस्त चंद्रकांत भोपी यांनी आभार मानले. या बैठकीला प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार उपस्थित होते.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT